‘आवळा कॅण्डी’ थायलंडला !

“उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजरेत सदा नवी दिशा असावी घरट्याचे काय, बांधता येइल केव्हाही…… आकाशाच्याही पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी”
फक्त सही करण्यापुरते अक्षरज्ञान असणाऱ्या जालना जिल्ह्यातील सिंधी कोळेगावामधल्या सीताबाई मोहिते आवळा कॅण्डी घेऊन ‘थायलंडला जाणार आहेत.
यशस्विनी अभियानाने त्यांना हाक दिली आणि सीताबाईंनी त्या हाकेला साद देऊन यशस्वी उद्योजिका झाल्या. १९९२ साली रामभाऊ मोहिते यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. सीताबाईंनी बोलताना सांगितले की कमी शिक्षणामुळे आपल्याला शहरात जाऊन नोकरी मिळणार नाही, मुलांना वाढवून मोठं करायचं आहे. घर चालवायचं आहे. दोन एकर शेती होती; पण तिचा काही उपयोग नाही, हे दोघांना माहीत होते.
संत तुकडोजी महाराजांच्या ‘कच्चा माल मातीच्या भावे… पक्का होताच चार पटीने घ्यावे’ या ओळी लक्षात घेऊन त्यासोबतच इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्याची जिद्द कायम मनात ठेवून चार वर्षे दुसऱ्यांच्या शेतात सालदारी केली. मिळणाऱ्या रोजगारामधून २०० रु. जमा करून त्यामधून १९९७ साली घरी स्वतः सेंद्रिय खताचा वापर करून रोप तयार केले. त्यातून रोपवाटिकेचा उद्योग सुरू केला. आणि या रोपवाटिकेला शासनमान्य ‘अनुसया फळ रोपवाटिका’ असे नाव देण्यात आले. वर्षाला एक ते दीड लाखाचे उत्पादन मिळू लागले. ही रोपे कृषी विभागामार्फत उज्जैनला पाठविली जातात. काही वर्षांनी त्याला जोडून आवळा कॅण्डीचा उद्योग सुरु केला. सहा महिने रोपवाटिका आणि सहा महिने आवळा कॅण्डीचे काम चालते. पुढे गांडूळ खताचा उद्योग सुरु केला. कृषी विभागामार्फत संपूर्ण महाराष्ट्रात गप्पा-गोष्टि कार्यक्रमासाठी आमंत्रित करून एक यशस्वी उद्योजक म्हणून महिलांशी संवाद साधला जातो.
सीताबाईशी गप्पा मारताना ही एक गोष्ट जाणवली की त्यांना हा उद्योग सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. असे म्हणतात की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो; पण त्या म्हणाल्या की एका यशस्वी स्त्रीमागे एका पुरूषाचा हात असतो. त्यामुळेच मी एक चांगली यशस्वी उद्योजक बनले आहे.
त्यांना मी विचारले की आतापर्यंत किती पुरस्कार मिळाले ? त्या मोकळ्या मनाने म्हणाल्या की खरे पुरस्कार माझे आई वडील, सासू-सासरे आणि पती आहेत. लहान-मोठे असे २२ पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रात कोठेही स्टॉल लागला की आमच्या स्टॉलचा पहिला किंवा दुसरा नंबर येतो. पुणे येथे राज्य शासनाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार मिळाला तेव्हा घोषणा केली की सीताबाई मोहिते यांची अभ्यास दौऱ्यासाठी थायलंडला जाण्यासाठी निवड झाली. हे ऐकल्यावर काही क्षण असं वाटलं की मी स्वप्न तर बघत नाहीये ना !
जेव्हा घरच्यांना, नातेवाईकांना कळाले तेव्हा सगळ्यांच्या बोलण्यात हेच होते की एक सामान्य आणि कमी शिकलेली स्त्री आज थायलंडला निघाली बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारे आनंद आणि सुख दिसत होते.