बाबा रामदेव यांची टीम अण्णाला शिकवण

बाबा रामदेव आणि अण्णा हजारे

बाबा रामदेव आणि अण्णा हजारे

‘टीम अण्णा’ चे आंदोलन जनतेच्या थंड प्रतिसादामुळे दुर्लक्षिले जात होते पण आंदोलनाच्या तिसऱ्याच दिवशी योगगुरु बाबा रामदेव आपल्या दोन हजार समर्थकांसह तेथे सहभागी झाले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर ‘टीम अण्णा’ने केलेले आरोप योग्य नाही असे म्हणत बाबा रामदेव यांनी आंदोलनाचा सर्व फोकस स्वतःकडे खेचून घेतला.

बाबा रामदेव यांनी रामलीला मैदानापासून मोर्चा घेत थेट जंतर मंतरवर पोहोचले. अवघे तीनशे समर्थक ‘टीम अण्णा’च्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. मात्र, मैदानावर बाबा रामदेव यांचे आगमन होताच तीनेक हजार लोकांचा जथ्था गोळा झाला.

जी व्यक्ती राज्यघटनेतील सर्वोच्च पदावर आहे, त्या व्यक्तीवर टीका करणे योग्य नाही, असे बाबा रामदेव यांनी ठासून सांगत ‘टीम अण्णा’ला चिमटे काढले. ‘टीम अण्णा’ला आपला पूर्ण पाठिंबा आहे परंतु, कोणावरही व्यक्तिगत टीका करु नये, अशी मखलीशीही त्यांनी दिली. येत्या नऊ ऑगस्टपासून परदेशांत दडवलेला काळा पैसा परत आणण्याच्या मागणीसाठी आपण आंदोलन करणार आहोत व त्या दिवशी दिल्लीत नऊ लाख जण रस्त्यावर उतरतील, अशी घोषणा सुद्धा त्यांनी केली.