बैल आणि बोकड

सिंह मागे लागला म्हणून एक बैल जीव घेऊन पळाला तो एका गुहेत शिरत असता, तेथे एक बोकड होता, तो त्यास आत येऊ देईना. तो म्हणाला, ‘हे माझे घर आहे, यात तू आलास तर मी तुला मारीन !’ बैलाने फार विनवणी करून त्यास म्हटले, ‘अरे, माझ्या पाठीस सिंह लागला आहे, यावेळी मला आश्चय दयावा, हे तुझ्या गृहस्थपणास योग्य आहे.’ बकरा ते काही ऐकेना; तो शिंगे उभारून त्याच्या अंगावर धावू लागला. तेव्हा बैल त्यास म्हणतो, ‘अरे, मी तुला अथवा तुझ्या शिंगाला भीत नाही. परंतु, काय करू, मी संकटात सापडलो आहे. जर का या वेळी माझ्या मागे सिंह नसता, तर बैलाच्या आणि बोकडाच्या योग्यतेमध्ये किती अंतर आहे, याचा चमत्कार आताच दाखविला असता.’

तात्पर्य:- संकटात सापडलेल्यास यथाशक्ती साह्य न करणे हे मनुष्यपणास योग्य नाही, मग साह्य न करता उलट त्याचा धिक्कार करून त्यास त्रास देणे, यासारखा दुष्टपणा दुसरा काय आहे ?