बैल आणि चिलट

उन्हाच्या तापाने त्रासलेला एक बैल जवळच एक ओढा होता तिकडे गेला आणि अंमळ गार वाटावे म्हणून पाण्यात जाऊन उभा राहिला. इतक्यात एक चिलट येऊन त्याच्या शिंगावर बसले आणि त्यास मोठया आढयतेने म्हणाले, ‘बैलोबा, मी तुझ्याशी इतकी सलगी करीत आहे, याबद्दल तू मला क्षमा कर. माझे वजन जर तुझ्याच्याने सोसवत नसेल तर मला तसे स्पष्ट सांग म्हणजे त्या क्षणीच मी उडून जाईन आणि त्या पलीकडच्या झाडावर जाऊन बसेन.’

बैल उत्तर करितो, ‘अरे, तुला वाटले तर जा अथवा जाऊ नकोस, त्याची मला मुळीच पर्वा नाही. तुझे भाषण जर मी ऐकले नसते, तर तु येऊन माझ्या शिंगावर बसले आहेस, हेसुद्धां समजले नसते’.

तात्पर्य : काही लोकांस स्वतःला स्वतःचे मोठे महत्व वाटते, पण खरा प्रकार असा असतो की, लोक त्यांना कवडीचीही किंमत देण्यास तयार नसतात !