बैलांमागे नंदीबैल धावले !

विजापूरच्या आदिलशहाने जय्यत तयारीनिशी पाठविलेल्या महाबलाढ्य अफजलखानाचा निकाल लावणाऱ्या शिवाजीचा बिमोड अशा-तशा पगारी सरदारांकडून होणार नाही.’ असा विचार करुन, मोगलसम्राट औरंगजेब याने आपला मामा शाहिस्तेखान याला शिवाजी महाराजांच पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत रवाना केलं.

बरोबर प्रचंड फौजफ़ाटा घेतलेला शाहिस्तेखान मराठी राज्यातील प्रदेश जिंकीत व उधवस्त करीत, शिवाजी महाराज पन्हाळगडी सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडल्याचा मुहूर्त साधून पुण्यात घुसला आणि महाराजांच्या पुण्यातील लाल महालात त्याने मुक्काम ठोकला. तिकडे सरदार सिद्दी जौहर याच्या वेढ्यातून शिताफीने निसटून महाराज प्रथम विशाळगडी व नंतर राजगडावर गेले.

मग स्वत: महाराजांनी व काही त्यांचे निवडक मावळे यांनी लग्नातल्या वऱ्हाडी मंडळीचे पोषाख केले व ते सर्व एका लग्नाच्या वरातीबरोबर रात्रीच्या वेळी पुण्याभोवतीच्या मोगली सैन्याच्या वेढ्यातून पुण्यात घुसले. तिथून ते लपतछपत लाल महालात घुसले.

पहाऱ्यावरच्या पहारेकऱ्यांना मारुन, त्यांनी लाल महालातील शयन मंदीरात प्रवेश केला. महालात शिवाजी प्रकटल्याची चाहूल लागताच भयभीत झालेला शाहिस्तेखान, ‘शिवाजी आया ! शिवाजी आया !’ असे ओरडत किंचाळत त्या महालाबाहेर पळून जाऊ लागला. तेवढ्यात महाराजांनी त्याच्यावर तलवारीचा एक वार केला, पण पळत्या शाहिस्तेखानाच्या अंगावर तो वार बसला नाही. त्याच्या एका हाताची बोटेचं काय ती तुटली ! एवढा हाहा:कार उडवून दिल्यावर आपण जणू मोगलांचेच सैनिक आहोत असा बहाना करुन, ‘शिवाजी आया ! शिवाजी आया !’ अशी स्वत:च दंवडी पिटीत, महाराज व त्यांचे मावळे मोगल सैन्यात फ़िरु लागले.

लाल महालात शिवाजी व त्याचे मावळे आले असल्याचं शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या तोंडून ऎकताच मोगल सैनिक शहराबाहेरचा पहारा सोडून महालाकडे धावले, ती संधी साधून महाराज व त्यांचे मावळे पुण्याबाहेर पसार झाले.

ठराविक ठिकाणी पोहोचताच, तिथे उभ्या केलेल्या एका मावळ्याने खुणेचा कळजा वाजविला. तो आवाज पोहोचताच कात्रजच्या घाटात तयार ठेवून दिलेल्या दोन तीन मावळ्यांनी शे-दिडशे बैलांच्या शिंगाना बांधलेली पलिते पेटवून दिल व ते मावळे तिथून पळून गेले.

शिंगाच्या टोकांना बांधलेल्या पलित्यांनी पेट घेताच ते बैल सैरावैरा पळू लागले. घनदाट अंधारातून दिसणाऱ्या त्या पलित्यांच्या धावत्या ज्वाला पाहून, पुण्यातल्या मोगल सेनेला ते मशाली घेऊन पळून जाणारे शिवाजीचे मावळेच वाटले. ते सैनिक त्या बैलांच्या दिशेने धावले. या संधीचा फ़ायदा उठवून महाराज आपल्या मावळ्यांसह दुसऱ्या मार्गाने अगदी निवांतपणे सिंहगडास पोहोचले.
तिकडे मोगलांच्या, ‘नंदीबैला’ ना मात्र कात्रजच्या घाटात साधे बैलचं भेटले.