बलदंड चिमणी

लोखंडी सामानाच्या एका व्यापाऱ्यानं काशीस जाताना आपल्याकडला महत्त्वाचा असा बराचसा माल आपल्या एका मित्राकडे सांभाळण्यासाठी दिला.

काशीहून परत आल्यानंतर जेव्हा तो व्यापारी आपल्या मित्राकडे जाऊन, आपण ठेवायला दिलेला लोखंडी माल त्याच्याकडे मागू लागला, तेव्हा तो लुच्चा मित्र म्हणाला, ‘अरे दोस्त ! तुझा विश्वास बसणार नाही, पण आमच्या घरचे उंदीर असे जबरदस्त आहेत, की त्यांनी तुझा तो लोखंडी माल कुरतडून, खाऊन की रे टाकला !’

लोखंडाचा व्यापारी शांत व विचारी होता. त्यानं ओळखंल की, मित्र म्हणवून घेणाऱ्या या लुच्चान आपलं सर्व सामान विकून, त्या पैशावर स्वत:ची चंगळ करुन घेतली आहे. तरीही आपल्याला बनविणाऱ्या त्या गृहस्थाशी भांडणतंडा न करता, तो तिथून चूपचाप निघाला व सरळ चतूर न्यायाधीश तेनाली रमणकडे गेला. रमणने त्याची कैफ़ियत शांतपणे ऎकून घेतली आणि त्याच्या कानात काहीतरी युक्ती सांगितली. रमणच्या सल्ल्याप्रमाणे त्या व्यापाऱ्याने -जसे काही वावगे झालेचनाही असे भासवून- त्या आपल्या लुच्चा मित्राकडे पूर्ववत ये जा चालू ठेवली.

त्या लुच्चा मित्राच्या चार-पाच वर्षाच्या मुलाला त्या लोखंड व्यापाऱ्याच्या घरच्या मंडळींचा अतिशय लळा होता. तो लहान मुलगा अधूनमधून त्या व्यापाऱ्याच्या पाठी लागून, त्याच्या घरी जातही असे. एकदा तो लहान मुलगा असाच ‘काका काका ! मी येतो तुमच्याकडे’ असं म्हणून त्याच्या पाठी लागला. साहजिकच तो व्यापारी त्याला घेऊन आपल्या घरी गेला. ‘संध्याकाळी झाली तरी आपल्या मुलाला पोहोचवलं नाही ‘ असं पाहून त्या मुलाचा बाप त्याला नेण्यासाठी त्या व्यापाऱ्याच्या घरी गेला असता, दु:खी चेहऱ्यानं तो व्यापारी त्याला म्हणाला, ‘अरे दोस्ता ! तुझा विश्वास बसणार नाही, पण आमच्याकडल्या चिमण्या अशा जबरदस्त शक्तिमान झाल्या आहेत की, त्यातल्याच एका चिमणीनं पुढल्या अंगणात हुंदडत असलेल्या तुझ्या मुलाची मान चोचीत पकडली, आणि ती बलदंड बया त्याला कुठेतरी घेऊन की रे गेली !’

त्या मुलाच्या बापाने त्या व्यापाऱ्याविरुध्द तेनाली रमण यांच्याकडे फ़िर्याद केली. रमण यांनी दोघांना बोलावून घेतलं व त्या दोघांच म्हणणं ऎकून घेतलं. त्यानंतर त्यांनी लोखंडाच्या व्यापाऱ्याला प्रश्न केली, ‘व्यापारीशेठ ! तुमच्याकडे या गृहस्थांचा लहानगा मुलगा आला होता; हे तुम्ही कबूल करता ना ?’

व्यापारी -हो आला होता. मी ते कधीच नाकबूल करणार नाही. पण आमच्या घराचया पुढल्या अंगणात तो खेळत बागडत असता, एक धष्टपुष्ट चिमणी आली आणी त्याची मानगूट चोचीत पकडून त्याला कुठेतरी घेऊन गेली !

रमण – मुलाचे वडिल म्हणून तुम्हाला काय बोलायचं आहे ?

मुलाचा बाप – न्यायमुर्ती, चिमणी कितीही धष्टपुष्ट असली, तरी तिच्यात मुलाची मानगून चोचीत पकडून त्याला पळवण्याची ताकद असू शकते का ?

रमण – का नसावी ? तुमच्याकडल्या उंदरात जर लोखंडी पिंप, कुदळी, फ़ावडी, पहारी, अशांसारख्या अवजड लोखंडी वस्तू खाण्य़ाची ताकद आहे, तर यांच्याकडल्या चिमण्यात पोर पळविण्याची तशीच ताकद का असू नये ?त्या लुच्चा माणसाने आपला अपराध कबूल करताच, रमणने त्याला गडप केलेया लोखंडी मालाच्या किमतीच्या दुप्पट रक्कम त्या व्यापाऱ्यास देण्यास सांगितले, आणि त्या व्यापाऱ्याला त्या लुच्चा गृहस्थाने पोर त्याच्या स्वाधीन करायला सांगितले.