गुटखाबंदीची अंमलबजावणी

गुटखा

गुटखा

गुटखाबंदी लागू करण्याचा जो निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता त्याचे राज्यभरातून स्वागत होत आहे. राज्यभरात जे गुटख्याची विक्री व साठा तयार करतील, त्या संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल. अन्न व औषधद्रव्य प्रशासन (एफडीए) लवकरच याची अधिसूचना जाहीर करणार आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे राज्यमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी माहिती दिली की, ‘महाराष्ट्र राज्यात मध्यप्रदेश आणि केरळनंतर गुटखाबंदी लागू करण्यात आली आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राज्यात गुटखा उत्पादन होत नाही पण, जे गुटख्याचा साठा करतील व जे विक्री करतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’ अन्न सुरक्षितता कायद्यान्वये गुटख्यावर एका वर्षाची बंदीची तरतूद आहे. कायद्यात दुरुस्ती करुन ही तरतूद कायमची करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात येणार आहे.

राज्य सरकारला उशीरा सुचलेले शहाणपण, अशी प्रतिक्रिया सर्व जीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी देऊन या निर्णयाचे स्वागत केले आहे.

डॉ. गंगवाल म्हणाले की, ‘गुटखाबंदीसाठी पंधरा वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. गुटखा विक्रीतून मिळणारा शंभर कोटींचा महसूल महत्त्वाचा असला तरी त्यातून जे रोग उद्भवतात त्याच्यावर सरकार सहाशे कोटी रुपये खर्च करीत आहे.’