भरली केळी

साहित्य :

  • ६ मोठी पिलकेली केळी
  • १ नारळ
  • १ वाटी साखर (कमी घातली तरी चालेल)
  • २-३ वेलदोडे (पूड)
  • अर्धा कप दूध
  • ३ चमचे तूप
  • २ लवंगा
  • १ दालचिनीचा लहान तुकडा

कृती :

नारळाचा पांढरा भाग खरबडून घ्यावा. शक्यतो तळाचा काळसर भाग घेऊ नये. पण एखाद्या नारळाचा चव कमी येतो. तसे झाल्यास करवंटीजवळचा भाग घ्यावा. चवाच्या निम्मी किंवा एक तृतीयांश प्रमाणात साखर घ्यावी. त्यात थोडेसे दूध घालून मिश्रणचुलीवर शिजवून ठेवावे. कोरडे करू नये. जरा मऊ असावे.केळी सोलून मिश्रण भरण्याजोगी दोन उभ्या आडव्या चिरा देऊन बोटभर लांबीचे तुकडे करावे. नारळाच्या मिश्रणात वेलचीपूड घालून मिश्रण सारखे मिसळावे. प्रत्येक केळ्यात अर्धा चमचा सारण भरावे. रुंद पातेल्यात तूप तापवून त्यात वेलचीची साले, लवंगा व दालचिनी घालावी. त्यावर केळ्यांचे तुकडे घालावे. वरून उरलेले दूध शिंपडावे. आंच खूप कमी करावी. झांकणावर पाणी ठेवून केली मंद शिजवावीत.

घाईगडबडीत. केळ्याचे दोन उभे भाग चिरून इंचभर लांबीचे तुकडे चिरावे. हे तुकडे अगोदर तुपावर टाकावेत व शिजत आलेकी त्यात खोबऱ्याचे मिश्रण अलगद मिसळावे. थोडे दूध शिंपडून २-३ वाफा आल्या की उतरवून ठेवावे. निवाल्यानंतर खायला द्यावे.

नारळाचे सारण आदल्या दिवशी करून ठेवावे. म्हणजे सोपे जाते. नाविन्य म्हणून याबरोबर पुडिंग म्हणून चॉकलेट आईस्क्रीम द्यावे. उपासासाठी करायचे असल्यास कुल्फीचे कापही करून घालावेत. चमचाभर काकडी वरून घातल्यास निराळीच छान चव येते.