भाऊ आणि बहीण

एका गृहस्थास एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती. मुलगा रूपाने फार सुंदर होता, मुलगी साधारण होती.

ती दोन्ही मुले एके दिवशी आरशांत पाहात असता, मुलगा आपल्या बहिणीला म्हणाला, ‘ताई, मी किती सुंदर आहे. माझ्या सौंदर्यापुढे तुझे सौंदर्य काहीच नाही ?’ हे शब्द ऐकून त्या मुलीस फार वाईट वाटले.

ती आपल्या बापाजवळ गेली आणि आपल्या भावाने आपणास हिणवल्याबद्दलचे गाऱ्हाणे तिने त्याला सांगितले.

ते ऐकताच, बापाने दोन्ही मुलांस जवळ बोलावून म्हटले, ‘मुलांनो, तुम्ही दोघेही रोज आरशात पाहात जा. मुला, तुझ्या सौंदर्यास वाईट वर्तणुकीचा आणि असभ्यपणाचा कलंक लागू नये म्हणून तू आरशात पाहात जा; आणि मुली, तुझ्या रूपात जी थोडीशी उणीव आहे, ती सदाचरणाने आणि गोड भाषणाने भरून काढावी, या हेतूने तू आरशात पाहात जा.’

तात्पर्य : शारीरिक व्यंगावर सदुणांचे पांघरूण घालता येते, पण सदुण अंगी नसतील तर नुसत्या शरीरसौंदर्याने माणसाचे महत्त्व वाढणार नाही.