श्रीगजाननाचा जन्म

श्रीगजाननाचा जन्म

श्रीगजाननाचा जन्म

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘गजानन’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.

शंकर-पार्वती कैलासावर वास्तव्य करून असताना पार्वतीने एकदा शंकराकडे आपल्याला पुत्र हवा असा हट्ट धरला. ती शंकराला म्हणाली की निदान कैलास सोडून गेलेला माझा कार्तिकेय तरी शोधून आणा. पार्वतीचा हट्ट पुरविण्यासाठी शंकर कार्तिकेयास आणण्यास गेले. पण पार्वतीला पुत्रवियोग सहन होईना. म्हणून इकडे पार्वतीने एक मातीचा बाहुल तयार केला आणि ती त्याच्याशी खेळू लागली.

पार्वती म्हणजे साक्षात आदिमाया जगदंबाच! तर या जगदंबेला संतुष्ट करण्याची ही उत्तम संधी मानून श्रीविष्णूने यामातीच्या बाहुल्यात प्रवेश केला आणि बाहुला जिवंत झाला! विष्णू पार्वतीचा पुत्र झाला! इकडे शंकर कार्तिकेयाला घेऊन परत आले. तेव्हा त्यांना ही सर्व हकीकत समजली. त्यांना खूप आनंद झाला. हळूहळू पार्वतीला या पुत्राची गोष्ट सर्वांना कळली. त्याला पाहण्यासाठी सर्व देव कैलासावर येऊन गेले. त्यात शनीदेवसुद्धा आला. पण तो आपले डोळे उघडेना. आपली दृष्टी पडल्यास काहीतरी विपरीत घडेल अशी भीती त्याला वाटत होती. पण पार्वतीने ‘येथे सर्व मंगल आहे’ असे म्हणून त्याला डोळे उघडण्याचा आग्रह केला. तेव्हा अखेर शनीने डोळे उघडून पाहिले. त्याबरोबर एका क्षणात त्या पुत्राचे मस्तक उडून गेले. कैलासावर एकच कोलाहल झाला.

पार्वतीने आक्रोश सुरु केला. शंकराने आपल्याला गणांना मस्तक शोधण्यासाठी पाठविले. पण ते शीर काही सापडेना. शेवटी शंकराने आपल्या गणांना आज्ञा दिली, ‘दक्षिणेकडे पाय करुन जो प्राणी झोपला असेल त्याचे डोके कापून आणा.’ मग गण बाहेर शोध घ्यायला निघाले. शोधता शोधता गणांना एक हत्ती दक्षिणेकडे पाय करुन झोपलेला दिसला. त्याचेच मस्तक कापून ते शंकराकडे घेऊन आले. मग शंकराने हेच मस्तक त्या शिरविरहीत पुत्राच्या देहावर ठेवले आणि पार्वतीपुत्र पुनः आपल्या मंत्रसामर्थ्याने जिवंत केले.

हत्तीचे मस्तक पुत्राल मिळाले म्हणून शंकर-पार्वतीचा हा पुत्र ‘गजवदन’ झाला. गज म्हणजे हत्ती. आनन म्हणजे तोंड, गजाचे आनन म्हणजे गजानन. शंकराने गजाननाला गणांचा अधिपती केल्यामुळे तो ‘गणपती’ झाला.