बंधुत्वात आली गोडी

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंधूभेट

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची बंधूभेट

शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा कार्यक्रम सोडून अलिबागहून थेट होस्पिटलसाठी धाव घेतली. त्यांनी आपल्या भावाची भेट घेतली व त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचा प्रेमळ सल्ला दिला. दुपारी दोघ्या बंधूंनी अर्धा तास संवाद साधला. त्यानंतर सायंकाळी राज यांनी उद्धव यांना ‘मातोश्री’वर सोडले.

दोन दिवसांपूर्वीच नियमित तपासणीसाठी उद्धव यांनी लीलावती हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निरणय घेतला होता. पण काल सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉ. अजित देसाई, डॉ. मॅथ्यू, डॉ. मेनन यांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. उद्धव यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले व त्यांची अ‍ॅंजिओग्राफी करण्यात आली. त्यानंतर अ‍ॅंजिओप्लास्टीचा निर्णय अ‍ॅंजिओग्राफीच्या अहवालानंतर घेतला जाणार आहे.

मनोहर जोशी, गजानन कीर्तिकार, रामदास कदम, एकनाथ शिंदे, नीलम गोऱ्हे आणि शेकडो पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे कळताच धाव घेतली.

अलिबाग येथील हॉटेल रेडिसन्समध्ये मनसेच्या राज्यस्तरीय तीनदिवसीय शिबिराला आजपासून सुरुवात होणार होती. या कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी राज तेथे गेले होते. पण उद्धव यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे समजताच राज यांनी मुंबई गाठली. राज हॉस्पिटलमध्ये दुपारी पोहोचले. त्यांनी उद्धव यांच्याबरोबर अतिदक्षता विभागात संवाद साधला. शर्मिला ठाकरे आणि मनसेचे तीन आमदार राज यांच्यासह त्यावेळेस उपस्थित होते. उद्धव यांच्या प्रकृतीबाबत राज यांनी डॉक्टरांकडून माहिती घेऊन ते बाहेर पडले व सायंकाळी पुन्हा हॉस्पिटलमध्ये गेले. आपल्या गाडीत राज यांनी उद्धव यांना पुढे बसवून स्वतः गाडी चालवली व त्यांना मातोश्रीवर आणून सोडले. उद्धव यांची प्रकृती स्थिर आहे, असे सांगण्यात आले.