चंद्र चुलीत गेला

एकदा भोज राजा हा आपल्या राज्याची राजधानी असलेल्या धारानगरीतून फ़िरत असतां त्याने एका अत्यंत गरीब पण सुस्वरुप तरुण स्त्रीला चुलीत जाळ करण्यासाठी चुलीजवळ तोंड नेऊन, फ़ुंकर मारीत असताना पाहिले.

चुलीजवळ तिनं नेलेला तिचा चेहेरा हा चेहेरा नसून, तो जणू चंद्रमाच आहे, असा त्याला भास झाला. म्हणून दुसऱ्या दिवशी राजसभेत जाताच, त्याने तिथे असलेल्या विद्वान समोर समस्यापुर्ती करण्यासाठी ‘आकाशिचा चंद्र चुलीत गेला’ ही ओळ सादर केली.

बऱ्याच जणांनी विचार केला, पण ती समस्या-पुर्ती करणे कुणालाच जमेना. अखेर भोजराजाने आपली प्रश्नार्थक नजर कालीदासाकडे वळविली. त्याबरोबर पुढे होऊन, त्या पुढीलप्रमाणे समस्यापूर्ती केली -:

श्लोक
चंद्रनना फ़ुंकित पावकाला /
सखेद आश्चर्य गमे मनाला /
अहो समाचार विचित्र झाला /
आकाशिचा चंद्र चुलीत गेला //

(विस्तृत अर्थ -चंद्राप्रमाणे चेहरा असलेली एक सुंदरी चुलीतीअ अग्नी प्रज्वलीत करण्यासाठी चुलीजवळ तोंड नेऊन फ़ुंकर मारत होती. तो प्रकार पाहून मला आश्वर्याप्रमाणेच खेदही वाटला कारण असे विचित्र झाले की, मला जणू आकाशातला चंद्रच चुलीत गेल्याचा भास झाला!)