दागिन्यांचा खर्च कशाला

एका बाईने पतीपाशी दागिन्यांसाठी हट्ट धरला. पति म्हणाला, ‘माझा पगार बेताचा आहे. आपल्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नासाठी, केवढे पैसे लागतील ? मग आपल्या मुलामुलीच्या भविष्यकाळाच्या तरतुदीसाठी साठवलेले पैसे दुसऱ्यांसाठी दागिने विकत घेण्यात खर्च करणे, तुला योग्य वाटतं का ?’

बायको म्हणाली, ‘अहो ! मी कुणा दुसऱ्यांसाठी दागिने करायला सांगत नाही तुम्हाला ? मी जे दागिने मागते आहे, ते मला माझ्यासाठीच हवे आहेत.’

नवरा म्हणाला, तू जे दागिने मागतेस, ते तुला तुझ्या साठीच हवे आहेत का ? मग मी ते अवश्य करीन, पण एका अटीवर. ती म्हणजे तू घराबाहेर पडताना, ते दागिने अंगावरुन उतरवून घरात ठेवून यायचे आणि एरव्ही कधी कुणी आपल्या घरी येताना दिसले रे दिसलं, की तेव्हाही दागिने तू पटकन अंगावरुन काढून लपवून ठेवायचे. मग बाकीच्या वेळी ते दागीने तू दिवसरात्र अंगावर घातलेस तरी चालेल. कुणीकडून घराबाहेरच्या कुणाही माणसाच्या दृष्टीस ते दागिने कधीही पडता कामा नयेत. आहे कबूल?’

बायको म्हणाली, ‘तुमचं म्हणणं मला पटलं. दागिने हे जिचे तिनेच घालायचे असले, तरी त्या दागिन्यात आपल्याला लोकांनी पहावं यासाठी, म्हणजेच दुसऱ्यांसाठी ते घालायचे असतात. तेव्हा आपल्या मुला-मुलीच्या भविष्याकाळाच्या तरतुदीपेक्षा दागिने घालण्याची हौस काही महत्त्वाची नाही. अंगावर दागिने असले, तर लोक आपल्याला पाहण्यासाठी मस्तक वर करतात, पण अंगी सदगुण असले, तर लोक आदर व्यक्त करण्यासाठी मस्तक वाकवतात.’