दानसंकल्पना

या कर्तव्याधिकारातूनच अगदी सहजपणे निर्माण झाली दानसंकल्पना. पूर्वी अनेक घरी माधुकरी येत व नैवेद्य झाल्याबरोबर प्रत्येकासाठी भाकरी, पोळी, त्यावर भात व वाटीत भाजी-आमटी ठेवली जाई. शिवाय तीनचार वारकरी असत. म्हणजे गरीब मुले ठराविक वारी, ठराविक घरी जेवायला असत. त्यांची राहायची सोय अशीच कोणाकडे तरी झालेली असायची, शिकण्यासाठी आपले घर सोडून परक्या गावात आलेल्या या मुलांची सोय घरोघरी व्हायची. घरोघरी येणाऱ्या या वारकऱ्यांनी आबाळ होणार नाही, याची काळजी घेतली जायची. अनेक घरांतून भिक्षेकऱ्यांना वाढण्यासाठी बाहेरच्या खोलीत एक कोनाड्यात धान्य भरून डबा ठेवलेला असायचा. नेवैद्याबरोबरच गोग्रास वाढला जाई. परसदारी जाऊन कावळ्याला पोळीचा चतकोर ठेवला जाई. अन हे सगळे करताना आपण विशेष काहीतरी करतोय असे कोणाला वाटतच नसे. त्या गोष्टी अंगवळणि पडलेल्या असत.

आचार्य विनोबा भावे आपल्या लहानपणी एक आठवण सांगत. एकदा त्यांच्या आईने त्यांना एका भिकाऱ्याला भिक्षा वाढण्यास सांगितले. विनोबा आईला म्हणाले, “ चांगला गलेलठ्ठ दिसतो. काही काम न करता उगाच भीक मागतो आहे. ” आई म्हणाली, “ विन्या, तूही तसाच आयतोबा नाहीस का ? अरे, देण्याची सवय असावी माणसाच्या हाताला. सारखे घेतच राहायचे ? ” घरात आई असाही संस्कार करू शकते. दातृत्वाचा अहंकार मात्र वाटता कामा नये. दातृत्वाची जाहिरातही नसावी. कर्तव्य केले त्याची जाहिरात कसली ?