देवाकडे राजा मागणारे बेडूक

एका मोठया तळ्यातल्या सगळ्या बेडकांनी, एके ठिकाणी जमून विचार केला की, आपण जिकडेतिकडे फिरतो, मनास वाटेल तसे वागतो, हे बरे नाही. आपणावर देखरेख करणारा कोणी तरी धनी असाव, म्हणजे त्याच्या भयाने आपण आपापल्या मर्यादेने राहू. नंतर त्यांनी, आपणास एक राजा दयावा, अशी देवाची प्रार्थना केली, ती ऐकून देवास हसू आले, आणि ‘हा घ्या राजा’ असे म्हणून, त्याने आकाशातून एक लाकूड टाकले. ते पाण्यावर आदळताच मोठा आवाज होऊन तळ्यातले पाणी उसळले, ते पाहून बेडूक भ्याले आणि लाकडापासून दूर उभे राहिले. थोडया वेळाने तळ्यातले पाणी शांत झाल्यावर, त्या लाकडाची हालचाल बंद झालेली पाहून, सगळे बेदूक हळूहळू त्याच्या जवळ गेले. त्याजवर चढून बसले आणि त्याच्याशी खेळू लागले. मग त्यांस असे वाटले की, हा राजा काही कामाचा नाही, देवाकडे दुसरा चांगला राजा मागावा. नंतर त्यांनी पुनः प्रार्थना केली. तेव्हा देवाने त्यांजकडे एक मोठा बगळा पाठविला. त्याने बेडकास खाण्याचा सपाटा चालविला, ते पाहून उरलेले बेडूक भिऊन गेले. मग त्यांनी पुन; देवाची प्रार्थाना केली की, ‘दुसरा कोणी तरी चांगला राजा पाठवावा, नाहीतर पूर्वीप्रमाणे राजावाचूनच राहू दयावे !’ ही प्रर्थाना ऐकून देव म्हणाला, ‘तुमचे मी आता काही ऐकणार नाही. मी पहिल्याने जो राजा दिला होता, तो तुम्हास आवडला नाही, तर आता तुमचे कर्म तुम्हीच भोगा !’

तात्पर्य:- ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवतो तिचा अनादार करून दुसऱ्या स्थितीची इच्छा करू नये. तसेच, मागणे मागावयाचे ते विचारपूर्वक मागावे.