दिलपसंद वडे

साहित्य :

 • १ वाटी उडदाची डाळ
 • १ वाटी हिरवे मूग
 • ८ हिरव्या मिरच्या
 • ५ सें.मी.आले
 • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
 • १ चमचा मीठ
 • पाव चमचा खाण्याचा सोडा
 • ४ चमचे तेल
 • दीड वाटी गोड दही
 • १ वाटी ताक
 • अर्धा चमचा मोहरी
 • पाव चमचा हिंग
 • अर्धा चमचा मिरेपूड
 • अर्धा चमचा जिरेपूड
 • अर्धा चमचा लाल तिखट
 • अर्धा चमचा साखर

कृती :

दिलपसंद वडे

दिलपसंद वडे

मूग आदल्या दिवशी भिजत घालून त्याला मोड येऊ द्यावेत. उडदाची डाळ तासभर भिजत घालावी. मिरच्या, आले बारीक चिरावे वा मोडाचे मूग, डाळ आणि कोथिंबीर घालून एकत्र बारीक वाटावे. मिक्सरमध्ये वाटल्यास अगदी कमी पाणी घालावे. मिश्रण पातळ असू नये. त्यात मीठ व सोडा घालून हाताने खूप फेसावे. मिश्रणाचे लहान आकाराचे छोटे वडे करावे. कुकरमध्ये इडली स्टँडवर किंवा चाळणीत स्वच्छ फडके अगर केळीचे पान ठेवावे व हे वडे उकडावेत.

एकीकडे दह्यात पाणी न घालता दही घुसळावे. त्यात तिखट, चवीनुसार मीठ, जिऱ्याची पूड व साखर घालून ढवळावे. तेल तापवून त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी व दह्यात घालावी. वाटीभर ताकात अर्धी वाटी पाणी घालावे. कुकरमध्ये वडे बाहेर काढले की गार होऊ द्यावेत. ताकात हे वडे थोडा वेळ बुडवून ठेवावेत. वाढण्यापूर्वी एका पसरट, सुबक भांड्यात वडे ठेवावे. वरून दही घालावे.

खास प्रसंगी चिंचेची आंबटगोड चटणी, बारीक शेव किंवा चमचाभर गाजराचा कीस घालून सजवावे.