दुधी हलवा

साहित्य :

  • १ ते सव्वा किलो दुधी भोपळा
  • २०० ग्रॅम खवा
  • २ कप सायीसकट दूध
  • पाऊण वाटी साखर
  • २ चमचे तूप
  • ३ वेलदोडे किंवा पाव चमचा जायफळाची पूड.

सजावटीसाठी :

  • काजूबदामाचे काप
  • चारोळ्या
  • बेदाणा
  • टूटीफ्रूटी यापैकी काहीही.

कृती :

दुध्याची साल काढून किसावा. किसाला पाणी सुटते ते ताकू नये. पातेल्यात तूप तापवून त्यावर ३-४ मिनिटे कीस परतावा.. किसाचे पाणीही घालावे व कुकरमध्ये इतर पदार्थांबरोबर कीस शिजवून घ्यावा. पातेल्यात शिजवायचा असल्यास थोडे तूप जास्त घालावे. अधूनमधून ढवळत रहावे. साधारण २०-२५ मिनिटात कीस शिजेल. दुसऱ्या मध्यम पातेल्यात खवा कुस्करावा. मंद आंचेवर गरम करावा. गुठळ्या मोडून मऊ झाला की तुपकट दिसू लागेल.

शिजलेल्या किसात खवा घालून ढवळावा. एक उकळी आली की साखर घालावी व चारपांच मिनिटे सतत ढवळावे. आंच कमी ठेवावी. खाली उतरवून वेलचीपूड व बेदाणा हलवा कोमट झाल्यानंतर घालावा. वाढण्याच्या वेळी इतर मेवा घालावा.

जास्त घट्ट हलवा आवडत असल्यास १०० ग्रॅम खवा जास्त घालावा व सहासात चमचे साखर अधिक घालावी. करून फ्रीजमध्ये ठेवल्यास दोनतीन दिवस टिकतो. पार्टीसाठी करायचा असल्यास अगोदर करून ठेवता येईल. सजावट फक्त आयत्या वेळेला करावी.