डुकरी आणि लांडगा

डुकरी आणि लांडगा

एक डुकरी नुकतीच व्याली होती. ती आपली सगळी पिले जवळ घेऊन गवतात बसली असता, त्यातील एकादे पिलू मिळाले तर पाहावे, या हेतूने एक लांडगा त्या ठिकाणी आला. काही तरी लुच्चेगिरी केल्याशिवाय, आपला डाव साधणार नाही, असे पाहून, तो डुकरीस म्हणाला, ‘ताई, तुझी प्रकृति आज बरी दिसत नाही. तू अंमळ मोकल्या हवेत फिरून येशील, तर तुला बरे वाटेल. तू येईपर्यंत तुझी मुले मी संभाळतो.’ डुकरी म्हणाले, ‘तुझ्या हया सूचनेबद्दल मी तुझी फार आभारी आहे. पण, मी बाहेर गेल्यावर माझ्या मुलांचा सांभाळ तू कसा काय करणार हे मला चांगले ठाऊक आहे. परोपकारीपणाचे नुसते ढोंग करण्यापेक्षा तू जर खरोखरच परोपकारी होशील, तर मला पुनः आपले तोंड दाखविण्याचा प्रसंग तुजवर कधीही येणार नाही.

तात्पर्य:- दयाळूपणा दाखविण्याच्या निमित्ताने नाश करू इच्छिणाऱ्या माणसासारखा भयंकर माणूस दुसरा नाही.