दुर्गा,लक्ष्मी आणि सरस्वती म्हणजेच रश्मी

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रश्मी करंदीकर

असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रश्मी करंदीकर

पोलीस म्हटले की, सामान्य माणसाला ‘ऍलर्जी’च असते. पोलिसांचे लफडे नको असे म्हणून कित्येकदा आपण आपल्या सामाजिक जबाबदार्‍यांनाही ‘ठेंगा’ दाखविण्यास कमी नाही करत. आपलं रक्षण करणार्‍यांपासूनच आपण पळत राहतो. पोलीस सगळ्यांकडे ‘एक केस’ म्हणूनच पाहतात व त्यांना भावनाच नसतात असे समजणार्‍यांनी रश्मी करंदीकरांना नक्कीच भेटावे. भिवंडीमधील त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यावर हसतमुखाने स्वागत करणार्‍या असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस रश्मी करंदीकर यांचं कोलगेट स्माईल पाहून आपण पोलीस ठाण्यामध्ये आहोत हा तणाव अजिबात जाणवत नाही. रश्मीचा जन्म एका सर्वसाधारण मध्यमवर्गीय घरात झाला.

१९२७ मध्ये स्त्रियांसाठी ‘करीयर’ हा शब्द जन्मालाच आला नव्हता तेव्हा त्यांची आजी शाळेत प्राध्यापिका होती. आजोबा व आईदेखील प्राध्यापक असल्यामुळे शिक्षणाचा मोह लहानपणापासूनच. माझगावला राहणारी रश्मी दादरच्या आय.ई.एस. शाळेतील मराठी माध्यमातून शिकली. माटुंग्याच्या रुईया कॉलेजमध्ये विज्ञान शाखेचा अभ्यास करत असताना मनात इंजिनीअर व्हायचे स्वप्न होते. बारावीनंतर इंजिनीअरिंगला जाता आले नाही. कारण आई-वडिलांवर डोनेशनचा भार टाकायचा नव्हता. मग पुढे बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स या विषयात पदवी मिळविली. मंत्रालयात सेक्शन ऑफिसर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळविली. नोकरीच्या दरम्यान महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व महिलांमध्ये पहिला नंबर काढला. नोकरी सोडून पोलीस खात्यात येण्याच्या निर्णयात त्यांचे पती पुरुषोत्तम चव्हाण यांचाही सहभाग होता. २००४ ते २००७ या ट्रेनिंगच्या काळातही पतीकडून संपूर्ण आधार असल्यामुळे अडचणींना सामोरे जाताना कधी एकटे वाटले नाही. पोलीस खात्यातले पहिले पोस्टिंग भिवंडीत झाले आणि कार्यरत होताच पहिल्या महिन्यातच भिवंडीत दंगल झाली. दोन कॉन्स्टेबल मारले गेले. पोलिसांवर रोष काढला जात होता. हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत भीतिदायक क्षण होता. कारण त्या कामावर असताना पती घरी एकटेच व घराखालच्या चौक्या जाळल्या जात होत्या. त्यांनी घरी फोन करून त्यांच्या नावाच्या पाटीवर पांढरा कागद लावायला सांगितला. आपण समाजात संरक्षण करत फिरताना आपल्या परिवाराचे संरक्षण होत असेल ना या चिंतेचा अनुभव त्यांना पहिल्यांदाच आला. रश्मीला पुस्तकं वाचायला, फिरायला, गप्पा मारायला खूप आवडते. त्यातून शिक्षण घेत राहणे हा तिचा आगळा वेगळा छंद. ‘जागतिकीकरणाचा शहरी स्त्रियांवर होणारा परिणाम’ या विषयावर त्यांची पीएच.डी. सुरू आहे. छंद जोपासायला फार वेळ मिळत नाही, पण पाककलेचे सर्व एक्सपरिमेंट पुरुषोत्तमवर केले जातात. तशा त्या कामातही अनेक एक्सपरिमेंट करत असतात. नवी मुंबईमधील तीन बारवर ४० मिनिटांत रेड घालून ६८ मुलींना वाचवण्याचा प्लॅन रश्मीने एखाद्या एक्सपरिमेंटसारखाच रचला होता.

कोपरीचा पुष्पक लॉज, तुर्भ्याचा डायना बार आणि वाशीचा कपिल बार मात्र रश्मीच्या नावाने आजही थरथरतात. कधी बुरखा घालून तर कधी वेश बदलून गुन्हेगारांचा शोध घेणे हे रश्मीसाठी रोजचेच काम आहे. हल्लीच त्यांनी भिवंडी, कल्याण गाजवले. रिक्षावाले होईल त्या भाड्याहून दुप्पट भाडे मागतात हे लक्षात आल्यावर एक वेगळीच मोहीम सुरू केली. दुसर्‍या एरियातील पोलिसांना साधारण कपडे घालून ग्राहकांसारखे रिक्षांमध्ये बसायला सांगितले. तेच पोलीस कपडे बदलून वेगवेगळ्या रिक्षात बसत. जास्त भाडे मागितले की, तिथल्या तिथे पकडायचे. त्यामुळे रिक्षावाल्यांना पोलिसांचा धाक बसून दादागिरीला पूर्णविराम मिळाला. रश्मीच्या कारकीर्दीत भिवंडीने एक करोड १० लाख दंड वसूल केला व ८० हजार केस दाखल केल्या. त्यांच्या आतापर्यंतच्या संपूर्ण कार्यकाळातील सर्वात त्रासदायक ठरली एका अपहरणाची केस. एका चार वर्षांच्या मुलीचे अपहरण झाले होते. गुन्हेगार कोण हे लक्षात आले होते, पण पुरावे आणि सरळ मार्गाचा प्रवास लांबचा ठरला. आठव्या दिवशी त्या मुलीचे शव सापडले. गुन्हेगार तोच हे सिद्ध झाल्यावर आपण त्या मुलीला वाचवू शकलो असतो, पण वाचवता आले नाही या विचाराने रश्मीला खूप यातना झाल्या.

‘‘पोलीस हे समाजात आईचे काम करतात. वेळ पडली तर फटके द्यावे लागतात. कधी कधी प्रेमाने समजवावे लागते. आईला आपले दु:ख सांगून चालत नाही तसे आम्हालाही आमच्या अडचणी उघडपणे सांगता येत नाहीत’’ असे रश्मीचे मत आहे. त्या त्यांच्या कामावर प्रेम करतात व या प्रवासात येणारी प्रत्येक कामगिरी त्या आनंदाने स्वीकारतात. गमतीची गोष्ट म्हणजे अनेकदा त्यांना पुरुष समजले जाते. छोटे केस, कडक वागणे याने गैरसमज होतात, पण गोड आवाजाने ही समजूत गैर ठरते. त्या यूपीएससीची परीक्षा देण्याकरिता दिल्लीला गेल्या तेव्हा नुकत्याच त्यांच्या आजी वारल्या होत्या. परके शहर, जवळच्या व्यक्तीचे निधन आणि परीक्षेचा भार सोसणे कठीण होताना पाहून पुरुषोत्तम आपले गाठोडे बांधून दिल्लीला रवाना झाले. वर्षभर दिल्लीत फिरून, शिकून तो काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा असे त्या सांगतात. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे आवडीनिवडी बाजूला सरल्या आहेत. वैयक्तिक जीवनालाही फारसा वेळ देता येत नाही. जेवायला घरी येणार सांगून बर्‍याचदा घरी पोहोचायला रात्रीचे १२ वाजतात. कधी रात्री-अपरात्री परत कामाला जावे लागते. सणासुदीलाही घरात थांबता येत नाही. शनिवार असो वा रविवार, काम आले की दिवस, वेळ पाहता येत नाही. बर्‍याचदा पिक्चरचं तिकीट काढलेलं असताना जाता येत नाही. अशा वेळी पुरुषोत्तमने अनेक सिनेमे एकट्याने पाहिले आहेत. एडलवाइस इन्वेस्टमेंट कंपनीचे मालक पुरुषोत्तम चव्हाण म्हणजेच रश्मीचे पती यांचा सिंहाचा वाटा आहे रश्मीच्या यशाच्या प्रवासात. टॅलेण्ट, जिद्द, आत्मविश्‍वास, यशस्वी होण्याची इच्छा, काहीतरी बदल घडविण्याचा निश्‍चय आणि पुरुषोत्तम हे होते रश्मीचे भांडवल. ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ एवढे म्हणून संपत नाही. आज स्त्रियांना फक्त शिक्षण नाही तर समाजाची व जोडीदाराची साथही तेवढ्याच गरजेची आहे. सायकॉलॉजीचा अभ्यास करणार्‍या रश्मीने पोलिसांचे एक वेगळे रूप जगासमोर आणले आहे. शालेय मुलांना रोड सेफ्टीच्या प्रचारात मिसळून घेणे, टॅ्रफिकसंदर्भात वेगवेगळे उपक्रम राबवणे हे सगळे ती फार जीव ओतून करते. ‘मला टीका नाही करायची, मला बदल घडवायचा आहे’ हे तिचे वाक्य लक्षात ठेवण्यासारखे आहे. आज रश्मी अनेक स्त्रियांसाठी एक उदाहरण आहे. स्त्री ही जन्मत:च आई असते. ती जे करते त्यात तिचा आईपणा दिसून येतो. पोलिसांच्या गणवेशात रश्मीदेखील मला एखाद्या आईसारखीच वाटते. कधी फटकवणारी, कधी समजवणारी. रश्मी करंदीकर हे नाव आज पसरत आहे आणि ते असेच पसरत राहावे व त्या गुणांचा सुगंध तिच्यासारख्या अनेक कर्तृत्ववान स्त्रियांपर्यंतही पोहोचावा.

रश्मी पुरुषोत्तम चव्हाण ऊर्फ रश्मी करंदीकर यांना पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मीचे हे कॉम्बिनेशन जग चालवेल पुढे.