फ़टफ़जिती

अब्राहम लिंकन हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणुक लढवीत असता, त्यांच्या विरुध्द उभा राहिलेला उमेदवार स्टीफ़न डग्लस हा एका प्रचारसभेत म्हणाला, ‘हा लिंकन पूर्वी दारूच्या गुत्यात ‘दारु विक्रेता’ म्हणून नोकरी करीत होता. आणि याला तुम्ही अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून देणार ?’

यावर आपल्या प्रचारसभेत लिंकन म्हणाले, ‘माझे प्रतिस्पर्धी उमेदवार श्री. डग्लस यांनी माझ्याविषयी जे विधान केले ते खरे आहे. बऱ्याच वर्षापूर्वी मी पोटासाठी एका दारुच्या गुत्यात दारुविक्याचे काम करीत होतो; त्या वेळी हे राजश्री त्या गुत्यात एक दिवसाचाही खंडा पडू न देता दारु प्यायला येत होते.
अर्थात मी दारु विकत असलो, तरी स्वत: ती पीत नव्हतो. शिवाय अवघ्या एक दोन वर्षात मी ती नोकरीही सोडून दिली. पण माझे प्रतिस्पर्धी श्री डग्लस यांनी मात्र त्या गुत्यात जाण्याचे व्रत अजूनही सोडले नाही. मग अशा नशाबहाद्दराला तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून देणार का ?’

डग्लस यांनी सोडलेले शस्त्र लिंकन यांनी त्याच्यावरच असे उलटवले की, त्या निवडणूकीत लिंकन विजयी झाले, तर डग्लस भिईसपाट झाले !