गाढव आणि कुत्रा

एकदा एक गाढवाने असे मनात आणले की, आपला धनी चिमण्या कुत्र्यावर फार प्रीति करतो; तर त्या कुत्र्याप्रमाणे आपणही बागडू लागलो, शेपटी हालवली आणि धन्याच्या मांडीवर चढून बसलो, तर आपल्यावरही धनी प्रीति करू लागेल. याप्रमाणे त्याचा विचार चालला आहे, तोच त्याचा धनी बाहेर गेला होता तो घरी आला आणि ओटयावर जाऊन बसला त्यास पाहताच गाढव त्याच्यासमोर जाऊन प्रथम इकडून तिकडे उडया मारू लागला; मग लांब सूर काढून ओरडला ती मौज पाहून धन्यास मोठे कौतुक वाटले व तो खदाखदा हसू लागला. नंतर त्या गाढवाने आपल्या मागल्या पायांवर उभे राहून पुढेचे दोन्ही पाय मोठया प्रेमाने धन्याच्या उरावर ठेवले, आणि आता तेथे बसणार तोच धन्याने आरोळी मारली. ती ऐकून घरातून एक चाकर हातात बडगा घेऊन आला. त्याने त्या गाढवाची हाडे ठेचून मोकळी केली, व धन्याच्या कृपेस पात्र होणे ही गोष्ट सर्वांसच साधत नाही, हे त्या गाढवास चांगले समजावून सांगितले.

तात्पर्य:- कित्येक जण कुत्र्यासारख्या चेष्टा करून आपल्या धन्यास रंजवितात, पण ते सर्वांसच साधते असे नाही.