गाढव, माकड आणि चिचुंद्री

एक गाढव आणि एक माकड, एके दिवशी, आपल्या सुखदु:खासंबंधाने बोलत बसले होते. गाढव म्हणाला, “माझे कान इतके लांब आहेत, की ते पाहून सगळे लोक मला हसतात, शिवाय मला बैलासारखी शिंगेही नाहीत.’

माकड म्हणाला, ‘आणि माझी स्थिति तरी काय आहे? माझ्या लांबच लांब शेपटीची मला मोठी लाज वाटते. कोल्ह्याच्या शेपटीसारखे गोंडेदार शेफूट मला असते तर काय बहार आली असती?’

हे त्या दोघांचे भाषण जवळच एक चिचुंद्री होती, तिच्या कानी पडताच ती म्हणाली, ‘तुम्ही विनाकारण कुरकुर करता. तुम्ही माझ्या स्थितीकडे पाहाल, तर आपली स्थिति किती तरी चांगली आहे, असे तुमच्या लक्षात येईल. आम्हा चिचुंद्रयांना शिंगे तर नाहीतच; शेपूट आहे, ते अगदीच आखूड आणि आमच्या डोळ्यांनी तर आम्हांस चांगले दिसतही नाही!’

तात्पर्य :- ज्यास देवाने जे काय आहे, तेच योग्य आहे असे समजून त्याने स्वस्थ असावे.