गणपती भालचंद्र झाला

गणपती भालचंद्र झाला

गणपती भालचंद्र झाला

एकदा ब्रह्मदेव कैलासावर शंकराच्या दर्शनाला गेले असता नारदही तेथे आले होते. त्यांनी एक अपूर्व अमृतमय फळ शंकराला अर्पण केले. शंकराजवळच तेव्हा कार्तिकेय आणि गजानन हे दोघे बसले होते. ते दोघेही त्या फळासाठी भांडू लागले. तेव्हा हे फळ कोणाला द्यावे, असा शंकराला प्रश्न पडला. ब्रह्मदेवाने ते फळ कार्तिकेयाला देण्याचे सुचवले. त्याप्रमाणे शंकराने ते फळ कार्तिकेयाला दिले. म्हणून गजानना ब्रह्मदेवावर रागावले.

पुढे एकदा शंकर व गजानन ब्रह्मदेवाच्या भेटीसाठी सत्यलोकी गेले असता शंकराचे लक्ष नाही असे पाहून गजानन उग्र स्वरुप धारण करुन ब्रह्मदेवास घाबरवू लागले. गजाननाचे ते अदभुत, उग्र आणि विद्रूप रूप पाहून शंकराच्या भालप्रदेशी असलेल्या चंद्रास मौज वाटली आणि तो गजाननाच्या उग्र रुपाची कुचेष्टा करून मोठ्याने हसू लागला. त्यामुळे गजाननास राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला, ‘तू माझ्या स्वरूपाची निंदा करून हसलास म्हणून त्रैलोक्यातील कोणीही जीव तुझे दर्शन घेणार नाहीत! जे घेतील त्यांना महापातक लागेल!’

गजाननाच्या शापामुळे चंद्राचे पूर्वीचे सौंदर्य लोप पावले आणि त्यास मलीन आणि दोन स्वरूप प्राप्त झाले. हे पाहून चंद्राला स्वतःचीच लाज वाटू लागली आणि तो लपून बसला.

हे वर्तमान जेव्हा साऱ्या देवांना समजले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. त्या सर्वांनी मिळून गजाननाची प्रार्थना केली आणि चंद्राला त्याचे पूर्वीचेच रूप मिळावे अशी श्रीगणेशाची करुणा भाकली. इंद्राने चंद्राला बोलावून आणले आणि गजाननाच्या एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे चंद्राने एकाग्र अंतःकरणाने एकाक्षर मंत्राचा बारा वर्षे तप केला.

चंद्राला झालेला पश्चात्ताप पाहून श्रीगणेशांनी प्रसन्न होऊन उःशाप दिला. तुझे पूर्वीचे सुंदर रूप तुला प्राप्त होईल. प्रत्येक महिन्याच्या कृष्णचतुर्थीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज माझी पूजा पूर्ण होणार नाही. तुझे दर्शन घेतल्यावरच माझे भक्त जेवतील व उपवास सोडतील. तसेच तुझी एक कला मी भूषण म्हणून माझ्या मस्तकी धारण करीन. परंतु भाद्रपद चतुर्थीस जे कोणी तुझे दर्शन घेतील त्यांच्यावर चोरीचा आळ येईल.’ असा वर मिळाल्याबरोबर चंद्राचा मलीनपणा नष्ट होऊन तो पूर्ववत तेजस्वी झाला.

तेव्हापासून गणपतीच्या मस्तकावर चंद्राची कला शोभून दिसते आणि म्हणूनच गणपतीला भालचंद्र असेही म्हटले जाते.

तसेच प्रत्येक संकष्टी चतुर्थीला गणेशभक्त दिवसभर उपवास करून रात्री चंद्र दर्शन झाल्याशिवाय जेवत नाहीत व उपवास सोडत नाहीत. पण भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीला रात्री चंद्राकडे कोणी पाहात नाही. जो चंद्राला यादिवशी पाहतो त्याच्यावर संकटे येतात व चोरीचा आळही येतो असे लोक मानतात.