गणराज रंगी नाचतो

गणराज रंगी नाचतो, नाचतो
पायी घागऱ्या करिती रुणझुण
नाद स्वर्गी पोचतो ॥धृ॥

कटी पितांबर कचोळ भरजरी
बाल दशानन नर्तनात करी
तुंडिल तनु तरी चपळ साजिरी
लावण्ये साजतो ॥१॥

नारद तुंबर करिती गायन
करे शारदा वीणा वादन
ब्रह्य धरितो तालही रंगुन
मृदंग झुन वाजतो ॥२॥

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मनी हर्षली
गौरी संगे स्वये सदाशिव
शिशु कौतुक पाहतो ॥३॥