गरुड पक्षी आणि मनुष्य

एका मनुष्याने जाळ्यांत एक गरुडपक्षी पकडला व त्याचे पंख कापून त्यास साखळीने एका खांबास बांधून ठेविले. शेजारी दुसरा एक शिकारी मनुष्य रहात असे, त्यास त्या पक्षाचे ते हाल पाहून त्याची दया आली. मग त्याने पैसे भरून तो गरुड विकत घेतला आणि त्याचा चांगला प्रतिपाळ केला. पुढे त्या पक्षाचे पंख वाढल्यावर त्याने त्यास सोडून दिले. गरुडाने एक उंच भरारी मारली आणि रानात जाऊन एक ससा पकडून तो त्या माणसास, कृतज्ञतेचे चिन्ह म्हणून, आणून दिला.

तिकडून एक कोल्हा चालला होता त्याने तो प्रकार पाहून गरुडास म्हटले, ‘गडया, मी जर तुझ्या जागी असतो, तर हा ससा मी त्या पहिल्या माणसास नेऊन दिला असता, कारण ज्याच्यापासून आपणास भय आहे त्याच्याशी मैत्री करावी आणि ते भय टाळावे, हा शहाणपणा होय. ज्या माणसाने तुला सोडवून तुझा प्रतिपाळ केला त्याच्यापासून तुला तसदी पोचण्याचा संभव नाही, पण ज्याने तुला पहिल्याने पकडून बांधून ठेविले होते, त्याच्याकडून मात्र तुला पुनः त्रास होण्याचा संभव आहे आणि म्हणूनच हा ससा त्यास देऊन, त्याच्याशी मैत्री करणे अधिक शहाणपणाचे झाले असते.’ यावर गरुड म्हणाला, ‘गडया, हा तुझा उपदेश कोल्ह्याला शोभण्यासारखाच आहे, पण माझे मत विचारशील तर, ज्याने आपणावर दया केली त्याला कृतज्ञता दाखवावी व ज्यांच्यापासून आपणास उपद्रव होण्याचा संभव आहे, त्यांच्याशी सावधगिरीने वागावे, हेच खरे शहाणपण होय, असे मला वाटते.’

तात्पर्य:- जे थोर आहेत त्यांच्याशी थोरपणानेच वागले पाहिजे, मग त्यांच्यापासून आपणास त्रास पोचण्याचा संभव असो वा नसो.