घार आणि कबुतरे

एका खुराडयात काही कबुतरे होती, त्यांस मारून खावे या उद्देशाने, एक घार त्या खुराडयाभोवती पुष्कळ दिवस घिरडया घालून थकली, परंतु एकही कबूतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ति योजिली ती अशी :- ती मोठया संभावितपणाने त्या कबूतरांपाशी गेली आणि त्यांस म्हणाली, ‘अहो, माझ्यासारख्या बळकट अणि शूर प्राण्यास जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे आणि तुमचे दुसरे शत्रु यांजपासून मी तुमचे रक्षण करीन.’ ससाण्याकडून होणाऱ्या त्रासात ती कबुतरे इतकी कंटाळली होती की, त्यांनी त्या घारीचे म्हणणे तत्काळ मान्य केले आणि तिला आपल्या खुराडयात राहण्यास जागा दिली. परंतु नित्य ही घार खुराडयातले एक कबूतर मारून खाते, असे त्यांस पुढे लवकरच आढळून आले व विचार न करता ह्या दुष्ट प्राण्यास आपल्या घरात जागा दिल्याबद्दल त्यांस फार पश्चात्ताप झाला.

तात्पर्य:- एक शत्रूपासून आपले रक्षण व्हावे म्हणून दुसऱ्या शत्रूचे साहाय्य घेणे, हा मूर्खपणा होय.