घीवर बासुंदी

साहित्य :

  • २ वाट्या मैदा
  • २ वाट्या पाणी
  • अर्धी वाटी हलवा
  • दीड लिटर दूध
  • ५ मोठे चमचे साखर
  • ४ वेलदोडे (पूड)
  • १ विणायची सुई
  • तळण्यासाठी डालडा
  • २ चमचे पिठीसाखर
  • काजूचे काप

कृती :

अर्धी वाटी डालडा परातीत किंवा ताटात फेसावा. कणी मोडून रंग पांढरा झाला पाहिजे व अगदी हलका, मुलायम व्हायला हवा. त्यानंतर त्यात थोडाथोडा मैदा मिसळून मऊ गोळा करावा. एका पातेल्यात हा गोळा घालून दोन वाट्या पाणी घालावे व हाताने मिश्रण सारखे करावे. साधी किंवा बीटर रवी घून खूप घुसळावे.

एका उंच डब्यात किंवा भांड्यात घीवर करण्यासाठी डालडा घालावा. भांडे सुमारे ४ ते ५ इंच व्यासाचे असावे. भांड्यात किमान २-२॥ इंच उंचीपर्यंत डालडा घालून कडकडीत झाला की पळीभार पीठ एका फुलपात्रात घालावे. व हात उंच करून पिठची धार तुपात हळूहळू ओतावी. घीवर कुरकुरीत झाला की नाही हे विणायच्या सुईने दाबून पहावे. दाबला गेला तर आणखी तळायला हवा व दाबला गेला नाहीत तर तयार झाला असे समजावे. सुईने अलगद काढावा व कागदावर निथळावा. असे सर्व धीवर तयार करावे. गरम असतानाच थोडीशी पिठीसाखर भुरभुरावी व काजूचे काप घालावे. बासुंदी करायची नसल्यास साखरेचा एकतारी पाक करून प्रत्येक घीवरावर चमचाभर पाकसुद्धा घातला तरी चालतो.

दूध चुलीवर ठेवून निम्मे होईपर्यंत आटवावे. त्यात साखर घालून पाच मिनिटे चुलीवर ठेवून ढवळावे. खाली उतरवून गार झाले की वेलचीपूड घालावी. पुडिंग म्हणून देताना एका पसरट भांड्यात घीवर रचावे व त्यावर बासुंदी ओतावी. अर्धा तास भिजले की जास्त चांगले लागतात.