घोडा आणि सांबर

एक घोडा आणि एक सांबर एका कुरणात नित्य एकत्र चरत असता, एके दिवशी त्यांची बोलाचाही झाली. सांबराने घोडयास आपल्या शिंगांच्या बळाने कुरणाबहेर हांकून लाविले. तेव्हा सांबराचे पारिपत्य करावे म्हणून घोडा माणसापाशी गेला आणि आपला पाठीराखेपणा करण्याची त्याने त्यास विनंती केली. माणसाने त्याच्या पाठीवर खोगीर घातले, तोंडात लगाम दिला आणि वर चढून बसला; फेरफटका करताना घोडयास त्याने चाबकाचे चार फटकेही लागावले ! घोडयाने तो सगळा त्रास मुकाटयाने सहन करून, माणसाच्या हातून साबराचा पराजय केला. नंतर तो माणसास म्हणतो, ‘हे भल्या माणसा, माझे कार्य झाले, मी तुझा फार आभारी आहे. आता हे खोगीर व लगाम काढून घे, मला जाऊ दे. ’ ते ऐकून मनुष्य म्हणतो, ‘गडया, तू इतका उपयोगी आहेस, हे पूर्वी मला ठाऊक नव्हते. आता या बंधनापासून तुझी सुटका होईल असे मला वाटत नाही. ’