गोकर्ण-महाबळेश्वराची स्थापना

राक्षसांचा राजा लंकाधीश, रावण हा अतिशय दुष्ट पण महापराक्रमी होता. तसेच तो शंकराचाही परमभक्त होता आणि मातृभक्तसुद्धा होता.

या रावणाची माता केकसी हीसुद्धा शिवभक्त होती. ती दररोज वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत असे. एकदा रावण तिला म्हणाला, ‘तुझा माझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना तू हे असे मातीचे शिवलिंग का पूजतेस? त्यापेक्षा मी साक्षात शंकराकडूनच शिवलिंग तुला आणून देतो. त्याचीच तू पूजा करीत जा.’

असे म्हणून रावण निघाला. तडक कैलासावर गेला आणि तेथे तपास बसला. अतिशय कठोर तपश्चर्या त्याने सुरू केली.

भगवान शंकर त्याची तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले. ते रावणासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, ‘हे भक्ता! तुझी निस्सीम भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग!’

तेव्हा रावणाने आपल्या मातेच्या नित्य पूजेसाठी शिवलिंग मागितले. शंकरानी मग रावणाला आपले आत्मलिंग देऊन सांगितले, ‘हे माझे आत्मलिंग आहे. याची दररोज पूजा कर. लंकेला नेऊन याची स्थापना कर. हे लिंग लंकेत जाईपर्यंत मध्येच कुठेही जमिनीवर ठेवून नकोस. जमिनीवर ठेवलेस तर तेथेच स्थापन होईल आणि ते तू लंकेत नेऊ शकणार नाहीस?’

रावणाने ते शंकराचे आत्मलिंग घेतले आणि तो लंकेकडे जाऊ लागला. शंकरांनी आपले आत्मलिंग रावणास दिल्याची वार्ता सर्व देवांना कळली. देव काळजीत पडले. रावणासारखा दुष्ट दैत्य जर साक्षात भगवान शंकराचे प्राण असलेले आत्मलिंग घेऊन लंकेस गेला तर तो आणखी सामर्थ्यशाली होईल. त्यामुळे तो अजूनच उन्मत्त होऊन देवांचे जीवन असह्य करेल अशी भीती त्यांना छळू लागली.

हे विघ्न दूर करण्यासाठी सर्व देव गजाननाकडे गेले आणि त्याला त्यांनी विनंती केली, ‘हे विघ्नहर्त्या, आम्हाला या संकटातून सोडव. रावणाला ते आत्मलिंग घेऊन लंकेपर्यंत पोहोचू देऊ नकोस’

त्यावर गजानन म्हणाले, ‘तुम्ही काही चिंता करू नका. निश्चितपणे रहा. मी ते शंकराचे आत्मलिंग लंकेला जाऊ देणार नाही.’ सर्व देवांना अभय देऊन गणेशाने बालगुराख्याचे रूप घेतले व तो रावणाच्या वाटेवर येऊन उभा राहिला.

थोड्याच वेळात रावण तेथे आला. तेव्हा संध्याकाळ होत आली होती रावण अत्यंत कर्मठ व प्रकांडपंडित होता. तसेच परमशिवभक्तही होता. सायंसंध्यां पश्चिम समुद्रात करून शंकराची आराधना करण्याचा रावणाचा नित्यनेम होता. त्यामुळे रावणाला विचार पडला. ‘आता संध्या करावी, तर हे शिवलिंग खाली ठेवावे लागेल आणि शंकरांनी तर ते खाली न ठेवण्यास सांगितले आहे. तेव्हा आता हे कोणाकडे द्यावे?’

असा विचार करीत असता, त्याचे लक्ष गाई राखत असलेल्या बालगुराख्याकडे गेले. त्याला जवळ बोलावून रावण म्हणाला, ‘अरे मुला, हे माझ्याजवळचं शिवलिंग घे, नीट सांभाळ. मी थोड्याच वेळात माझी संध्या आटोपून येतो. पण, मी येईपर्यंत हे शिवलिंग जमिनीवर ठेवू नकोस.’

तेव्हा तो बालगुराखी रावणास म्हणाला, महाराज! हे लिंग फार जड आहे. तुम्ही लवकर या. तुम्ही आला नाहीत तर मी ते जमिनीवर ठेवेन. त्यापूर्वी मी तुम्हाला तीन हाका मारीन.’

‘लवकरच परतेन’ असे सांगून रावणाने ते शिवलिंग बालगुराख्यांकडे दिले व तो सायंसंध्या करण्यास निघून गेला.

थोड्या वेळाने बालगुराख्याचे रूप घेतलेल्या गणेशाने पहिली हाक दिली. दुसरी हाक दिली. पुन्हा तिसऱ्यांदा आरोळी दिली. पण रावण आपल्या सायंसंध्येत मग्न असल्याने त्याला तिन्ही हाका ऐकू आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी गुराख्याने ते लिंग जमिनीवर ठेवले व तेथून निघून गेला. थोड्या वेळाने रावण परतला आणि पाहतो तो काय! बालगुराख्याच कुठे पत्ताच नव्हता आणि शिवलिंग जमिनीवर ठेवलेले. रावण खूप चिडला.

त्याने आपल्या सर्वशक्तिनीशी जोर लावून ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला. पण ते लिंग आपल्या जागेवरून तसूभरदेखील हलले नाही. शेवटी रावणाने खूप जोर लावून ते लिंग पिरगळून ओढले. त्यामुळे ते ‘गोकणांकार’ म्हणजे गाईच्या कानासारखे झाले. पण रावणच्या हाती काही आले नाही. तेव्हा चिडून रावण दाणदाण पावले आपटीत हात हलवीत लंकेत परतला.

याठिकाणी हे शिवलिंग गणपतीने ठेवले आणि गोकणांकार झाले त्या प्रदेशास लोक ‘गोकर्ण महाबळेश्वर’ म्हणू लागले व शिवभक्तासाठी परमतीर्थक्षेत्र झाले.
सर्व देवावरच संकट अशा प्रकारे गजाननाच्या बुद्धिचातुर्यामुळे टळले म्हणून सर्व देव गजाननावर खूष झाले. म्हणूनच मुलांनो म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ!

One thought on “गोकर्ण-महाबळेश्वराची स्थापना

  1. vijay

    ravanakade viman hote tyat basavun tyane matela shankarachya darshanasathi ka nele nahi ? gokarnala keleli upasana lavakar falprapti karun dete Mhanun tethe ravan yayacha.

Comments are closed.