गुळाची पोळी

साहित्य :

  • १ किलो किसलेला गूळ
  • १ वाटी तिळाचे कूट
  • १ वाटी खसखशीची व वेलदोड्याची पूड
  • अर्धी वाटी भाजून चुरलेले खोबरे
  • ५ ते ६ टेबल चमचा डाळीचे पीठ
  • ४ वाट्या कणीक
  • वाट्या मैदा
  • तेल
  • मीठ.

कृती :

कणीक मैद्याच्या चाळनीने चाळून घ्यावी व नंतर मोजून घ्यावी. कणीक, मैदा, मीठ व जरा जास्त मोहन एकत्र करून नेहमी पोळ्यासाठी पीठ भिजवतो तसे भिजवून ठेवावे. चांगला पिवळा गूळ किसून घ्यावा. तीळ, खसखस व खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावे खोबरे हाताने चुरून घ्यावे. खसखशीची व तिळाची पूड करावी. थोड्या तुपावर मंदाब्निवर डाळीचे पीठ भाजून घ्यावे. छान वास आला की उतरवावे. नंतर सर्व एकत्र व जरा मळून ठेवावे. वरील कणकेच्या दोन छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्या. एका पुरीवर गुळाच्या सारणाची लाटी ठेवावी. त्यावर दुसरी पुरी ठेवून कडा जुळवाव्या व नेहमीप्रमाणे तांदळाच्या पिठीवर पोळी लाटावी. नंतर सपाट पण जाड तव्यावर पोळी टाकून दोन्हीकडून भाजावी. घडी घालून उलथन्याने खाली काढावी. तवा उलथन्याने नीट सारखा करावा. इकडे तिकडे लागलेला गूळ काढून जुन्या कपड्याने तवा स्वच्छ करून दुसरी पोली टाकावी. वरील प्रमाणात बेताच्या आकाराच्या ४० ते ४२ पोळ्या होतात.