हंस आणि बगळा

अगदी मरणाच्या पंथास लागलेला एक हंस गात असता, ते गाणे ऐकून एक बगळा त्या ठिकाणी आला. तो हंसास म्हणतो, ‘अरे, तुझे हे गाणे ऐकून मला मोठे आश्चर्य वाटते. मरणाच्या वेळी गाणी गात बसणारा तुझ्यासारखा प्राणी या सृष्टीत दुसरा कोणीही नसेल.’ हंस उत्तर करतो, ‘गडया, मला मरणाबद्दल मोठा आनंद वाटत आहे. मी आता अशा स्थळी जाईन की, तेथे धनुष्यबाण, बंदूक किंवा क्षुधा यांचा त्रास होणार नाही. तर अशा आनंदाच्या वेळी मी जर थोडेसे गायन केले, तर त्यात एवढे आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे?’
तात्पर्य:- जी गोष्ट टाळता येणे शक्य नाही, तिच्या संबंधाने दुःख करीत बसणे हा वेडेपणा आहे.