हरिणी व तिचे पाडस

एक हरिणीचे पाडस एके दिवशी तिला विचारू लागले, ‘आई, तू कुत्र्यापेक्षा मोठी चपळ आहेस व त्याच्यापेक्षा तू जलद पळतेस, असे असता कुत्र्याचा शब्द ऐकताच तुला त्याची इतकी भीति वाटते, याचे कारण काय ?’ हरिणी हसून म्हणाली, ‘बाळका, तुझे बोलणे खरे आहे; पण कुत्र्याचा शब्द ऐकताच मला भीति वाटते, याचे कारण काय असावे, हे मलाही समजत नाही. मी कुत्र्याहून मोठी आहे, चपळही आहे; पण त्याचा शब्द कानी पडताच माझी अगदी गाळण होऊन जाते.’

तात्पर्य:- जो मूळचाच भित्रा, त्याला कितीही उमेदीच्या गोष्टी सांगितल्या तरी त्याला धैर्य येत नाही.