हम है ना

हम है ना
हम है ना

काही दिवसापूर्वी एक अतिशय समर्थक अशी जाहिरात टी.व्ही. वर पाहिली, अडचणीत हतबल झालेल्यांना दिलासा देणारा, मदत करणारा एक हात असतो. तो सांगतो घाबरू नकोस. खचून जाऊ नकोस. तुला मदत करायला ‘हम है ना’ ही जाहिरात एक आर्थिक संस्थेची त्यामुळे त्यात आर्थिक अडचणींवर मात हा हकच उद्देश दाखविला गेला पण ‘हम है ना’ हे दिलाशाचे शब्द सर्वव्यापी आहेत. “भिऊ नकोस मी पाठीशी आहे” हे स्वामी समर्थांचे शब्द असाच दिलासा देतात.

सुखात काय, दुःखात काय, माणसाला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी जवळचं कुणीतरी हवं असतं. विशेषतः एकाकीपणाची भावना जेव्हा माणसाला ग्रासून टाकते तेव्हा ‘हम है ना’ हा मंत्र आणि त्याबरोबरच मायेचा स्पर्श त्याला संजीवनी देऊ शकतो. तशी आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही ऐकणारं, त्यात आपल्याला साथ करणार कुणीतरी आहे ही जाणीव सुखाचा पोत वाढवते तर दुःखाची तीव्रता कमी करते.

एवढा जगविख्यात पॉप संगीताचा बादशहा मायकेल जॅक्सन एकाकीपणाच्या भावनेनेच ग्रासला होता. त्यातून बाहेर पडण्यसाठी त्यानं मार्ग शोधला तो मात्र चुकीचा, अंमली पदार्थांच्या सेवनाचा त्याला वेळीच ‘हम है ना’ असं म्हणणारं, त्याच्या पैशावर डोळा न ठेवता मनापासून साथ करणारं कुणीमिळतं तर त्याचा दुःखान्त टळला असता. वैफल्यापोटी आपल्या आयुष्याचा नास करून घेणारी अशी सेलिब्रिटी माणसं भलत्याच मार्गाचा अवलंब करून नको त्यात दिलासा शोधू शकतात. मेरिलिन मन्रो, मीनाकुमारी अशी कितीक उदाहरणं देता येतील.

परवा सुधाताई बाजारात भेटल्या. आग्रहानं घरी घेऊन गेल्या मी म्हटलं, ‘ताई एवढ्या मोठ्या घरात एकट्याच राहता भीती नाही वाटत?’ तेव्हा त्या म्हणाल्या, ‘छे ग! कधी एकटेपण जाणवू लागलं तर काय करते माहिताय?’ मला हाताला धरून त्या आत घेऊन गेल्या. आत बाळकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती देव्हाऱ्यात. ‘ह्याला सांगते सगळं. तो म्हणतो घाबरू नकोस. मी आहे ना!

सुधाताई इतका खंबीरपणा असणारी माण्सं विरळा. बहुतेकांना माणसांची साथ हवी असते. वृद्धापकाळी विवाहबद्ध होणारी जोडपी आपल्या समाजात टीकेचा विषय ठरतात. पण बरेचदा ती त्यांची अगतिकता असते. आपल्या दुखण्या खुपण्यात, सुखदुःखात साथीला ‘हम है ना’ असं म्हणणारं कुणीतरी हवं या भावनेतून आलेली.

आमचे मधुदादा म्हणजे एक उमदं व्यक्तिमत्व. मिल्ट्रीत होते ते. सारं आयुष्य धकाधकीत गेलेलं पण अजूनही उत्साहानं सळसळणारे. तरुणांनाही लाजवतील असे. सकाळी त्यांना फोन केला. म्हटलं वेळ असेल तुम्हाला तर येते संध्याकाळी गप्पा मारायला. म्हणाले, ‘संध्याकाळी मी कन्सल्टेशन्स घेतो!; आश्चर्याने मी म्हटलं ‘कसलं कन्सल्टेशन?’ दादा हसून म्हणाले, ‘अगं, या जगात अशी खूप माणसं आहेत ज्यांना आपलं दुःख सांगायलाही कुणी नसतं. मी त्यांना कान देतो! बरं वाटतं त्यांना खूप. अर्धे प्रॉब्लेम निघून जातात बघ माझ्याशी बोलले की, त्यांना कुणीतरी हवा असतो म्हणायला, ‘हम है ना’ चिंता करू नकोस!’

दादांचा हा वसा आपणही घ्यायला हवा. अडचणीत असलेल्या सगळ्यांना मदतीचा हात देणं शक्य नसतं. पण मानसिक आधाराची गरज असलेल्यांना ‘हम है ना!’ असा दिलासा आपण देऊ शकलो तरी आपण समाजाचं ऋण काही अशी फेडू शकू