हैदराबादी बदामाचा हलवा

साहित्य :

  • १०० ग्रॅम बदाम
  • २०० ग्रॅम साखर
  • पाव चमचा केशर (पाण्यात भिजवलेले)
  • ३ चमचे साजूक तूप.

कृती :

बदामाची साल काढून काप करावे. (रात्रभर बदाम गार पाणात भिजवावे किंवा गरम पाण्यात घालून मिनिटभर उकळावे.) नंतर बारीक वाटावे. दीड चमचा तूप वाटाणात मिसळावे. साखरेत पाणी घालून कच्चा पाक करावा. चमचाभर दूध घालून मळी काढून टाकावी. एकतारी पाकापेक्षा जरा कमी पाक होत आला की वाटलेले बदाम त्यात घालावे. ढवळताना थोडे-थोडे तूप घालावे. मिश्रण सुधारसाइतपत झाले की केशर घालावे. चांदीच्या किंवा नक्षिदार भांड्यात काढून ठेवावे. हा हलवा सुधारसा सारखा असतो व जास्त खाल्ल्यास जड पडतो. वाढताना लहान चमचा ठेवावा व प्रत्येकी डावभर हलवा लहान बॉल किंवा वाट्यात घालून द्यावा.

खास प्रसंगी व्हॅनिला आईस्क्रीमवर चॉकलेट सॉस‍ऐवजी हा बदाम हलवा सॉससारखा घालावा. तुमच्या कल्पकतेला दाद दिली जाईल.