जन पळभर म्हणतील

जन पळभर म्हणतील हाय हाय
मी जाता राहिल कार्य काय ? ॥धृ॥

सूर्य तळपतिल, चंद्र झळकतिल
तारे आपुला क्रम आचरतिल
असेच वारे पुढे वाहतिल
होईल कांहीं कां अंतराय ॥१॥

मेघ वर्षातिल, शेते पिकतिल
गर्वाने ह्यानद्या वाहतिल
कुणा काळजी कीं न उमटतिल
पुन्हा तटावर हेच पाय ? ॥२॥

सखे सोयरे डोळे पुसतिल
पुन्हा आपुल्या कामिं लागतिल
उठतिल, बसतिल, हंसुनि खिदळतिल
मी जाता त्यांचे काय काय ? ॥३॥

रामकृष्ण ही आले गेले
त्यांनविण जग कां ओसच पडले ?
कुणी सदोदित सूतक धरिले?
मग काय अटकले मज शिवाय ? ॥४॥

अशा जगास्तव काय कुढावे
मोहिं कुणाच्या कां गुंतावे ?
हरिदूता कां विन्मुख व्हावे ?
कां जिरवुं नये शांतीत काय ॥५॥