वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांना पद्मश्री

वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांना पद्मश्री

वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांना पद्मश्री

ठाणे जिल्ह्यातील डहाणू येथील जगप्रसिद्ध वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांना तब्बल ३४ वर्षांनंतर तीन एकर जमीन राज्य सरकारने दिली आहे. १९७६ मध्ये त्यांनी तत्कालीन राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी मशे यांचा खास सत्कार करताना, तुला काय पाहिजे, असे विचारले होते. तेव्हा मला घर आणि शेतीसाठी जमीनीचा तुकडा मिळावा, अशी विनंती मशे यांनी केली होती. मशे यांना पद्मश्री मिळाल्यानंतर सरकारला तीन दशकांपूवीर्च्या आश्वासनाची आठवण झाली आणि अखेर जमीन देण्याची कार्यवाही सुरू झाली.

डहाणूतील आदिवासी पाड्यावर राहणारे मशे यांना वारली चित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आहे. इंग्लडच्या राणीच्या लग्नाचे आमंत्रण म्हशे यांना होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत ते राणीच्या लग्नाला इंग्लडला गेले होते. त्यांनी अनेक देशांचे भ्रमण केलेले आहे. दोन दिवसांपूवीर्च त्यांना वारली चित्रकलेबद्दल पद्मश्री किताब जाहीर झाला. ७५ वर्षांचे मशे यांनी १९७६ मध्ये घर आणि शेतीसाठी जमीन द्यावी, असा अर्ज सरकारकडे केला होता. मध्यंतरी त्यांना जमीन देण्यात आली होती, परंतु त्या जमिनीवर अतिक्रमण असल्याने त्यांनी ती स्वीकारली नव्हती. त्यानंतर अनेकदा त्यांनी सरकारकडे खेटे घातले.

म्हशे गेली ३४ वर्षे जमिनीसाठी सरकार दरबारी हेलपाटे घालत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना शुक्रवारी सकाळी कळली. त्यानंतर महसूल खात्यातील त्यांच्या फाईलीवर धूळ झटकून तातडीने चक्रे फिरली. अशी चक्रे मंत्रालयात वजनदार व्यक्तींच्या फाईलसाठीच फिरतात. शुकवारी दुपारपर्यंत मशे यांना डहाणूतील गंजाड या गावामधील तीन एकर जमीन घर आणि शेतीसाठी मंजूर करण्यात आली. सायंकाळपर्यंत त्याची ऑर्डरही निघाली. काँगेसचे सरचिटणीस राहुल गांधी हे शनिवारी ठाण्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते मशे यांना ही जमिनीची कागदपत्रे देण्यात येतील.