कालीमातेला कौल

एक राजा दारुपान, घोडयांच्या शर्यती, जुगार, अशा अनेक दुर्व्यसनात पार बुडुन गेला होता. राज्यकारभाराकडे त्याचं लक्ष नव्हतचं. त्यामुळे राज्याची खरोखरच काळजी वाटणाऱ्या त्याच्या प्रधानाने, त्याची एकदा कान उघडणी केली. प्रधानाने केलेया या अपमानामुळे, राजा रागावला त्याने त्याला नोकरीवरुन काढण्याचा निर्णय घेतला.

‘प्रजेत अत्यंत लोकप्रिय असलेल्या प्रधानाला आपण कारण नसता काढलं,’ असं होऊ नये, म्हणून राजा एकदा भरदरबारात म्हणाला, ‘या प्रधानांना ताबडतोब नोकरीवरुन काढून टाक,’ असा कालीमातेनं काल माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिला. तरीसुध्दा ‘प्रधानांना काढण्यासाठी मी देवीच्या दृष्टांताची खोटीच सबब पुढे करीत आहे’ असं कुणी म्हणू नये, यासाठी ‘काढावे’ व ‘ठेवावे’ अशा दोन चिठ्ठ्या मी कालीमातेपुढे ठेवीन. नंतर त्या चिठ्ठ्यांपैकी कुणालाही एक चिठ्ठी स्वत: प्रधानजींनी उचलावी. तिच्यात जे लिहिले असेल ते त्यांनी मान्य करावे.’

राजाचा हा कावा प्रधानाच्या लक्षात आला. राजा दोन्ही चिठ्ठ्यावर असे लिहिणार, आणि त्या दोन चिठ्ठ्यापैकी कुठलीही जरी चिठ्ठी आपण उचलली तरी त्या चिठ्ठीवर ‘काढावे’ असेच असल्याने आपल्यावर नोकरी सोडण्याचा प्रसंग येणार, ही गोष्ट प्रधानाने ओळखली. म्हणून जेव्हा राजाने सर्व दरबारी मंडळी व न्यायमुर्ती यांच्या समक्ष मंदिरातील कालीमातेच्या मुर्तीसमोर अगोदरच घडी घातलेल्या दोन चिठ्ठ्या ठेवून, त्यांपैकी एक चिठ्ठी प्रधानाला उचलायला सांगितली.

तेव्हा प्रधान मुद्दाम म्हणाला, राजेसाहेब ! कालीमातेसमोर ठेवलेल्या या दोन चिठ्ठ्यापैकी एक चिठ्ठी मी उचलली आणि नेमकी त्याच चिठ्ठीवर जर ‘काढावे’ असे लिहिलेले निघाले, तर मीच देवीकडून मला नोकरीतून काढून टाकण्याचा कौल घेतला, अशी माझी नाचक्की होईल; त्यापेक्षा या दोन चिठ्ठ्यांपैकी कुठलीही एक चिठ्ठी देवीच्या कौलाची चिठ्ठी म्हणून देवीजवळ तशीच मिटलेल्या स्थितीत राहू द्यावी, आणि देवीच्या कौलाच्या विरुध्द उरलेली चिठ्ठी न्यायमुर्तींनी स्वत: उचलून व उघडून सर्वांसमक्ष वाचून दाखवावी. कुठली चिठ्ठी देवीजवळ राहू द्यायची व कुठली चिठ्ठी वाचून दाखवायाचे हे सर्व न्यायमुर्तींच्या इच्छेवर सोपवावे. न्यायमुर्तींनी देवीला नको असलेल्या निर्णयाची चिठ्ठी उघडून वाचून दाखविली, की तिच्यात असलेल्या निर्णयाच्य विरुध्द निर्णय देवीजवळ ठेवलेल्या चिठ्ठीत असणार हे ठरलेले असल्याने, ती देवीजवळची चिठ्ठी न उघडताही आपल्याला तो निर्णय कळून येईल, आणि मी तो मान्य करीन.’

प्रधानाने सुचविलेला हा बिनतोड पर्याय राजाला नाकारता येईना. नाइलाजाने त्याने न्यायमुर्तींना एक चिठ्ठी देवीपुढे ठेवून दुसरी चिठ्ठी उचलून ती उघडायला व वाचायला सांगितले. न्यायमुर्तींनी त्याचप्रमाणे करताच त्या चिठ्ठीत ‘काढावे’ असे लिहिले असल्याचे आढळले.

अर्थात आता कालीमातेच्या मुर्तीसमोर उरलेल्या चिठ्ठीत ‘ठेवावे’ हाच कौल असणार, असे राजाला मान्य करावे लागून, प्रधानजींनी नोकरीवरुन काढण्याचा बेत रद्द करावा लागला.