कावळा आणि कबुतरे

एका खुराडयांत काही कबूतरे राहात होती, त्यात आपली पिसे पांढरी करून एक डोमकावळा शिरला. तो जोपर्यंत गप्प होता, तोपर्यंत कबुतरांनी त्यास काही ओळखले नाही. पण आपल्या नव्या घरात राहून त्या कावळ्यास इतका आनंद झाला की, त्याच्याने फार वेळ स्तब्ध राहवेना. आनंदाच्या भरात तो मोठमोठयाने हसू लागला. तो शब्द कानी पडताच, त्याचे खरे स्वरूप काय आहे हे कबूतरांनी जाणिले आणि त्याजवर हल्ला करून त्यांनी त्यास तेथून हाकून लाविले. पुढे तो कावळा आपल्या स्वतःच्या मंडळीत गेला पण त्याची ती रंग लावलेली चित्रविचित्र पिसे पाहून कावळ्यांनीही त्यास जवळ येऊ दिले नाही.

तात्पर्य:- भलताच वेष घालून दुसऱ्यास फसविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य सर्वांच्याच उपहासास आणि तिरस्कारास पात्र होतो.