कावळा आणि सुरई

एक कावळ तहानेने व्याकुळ होऊन पाणी शोधत असता, एक सुरई त्याच्या दृष्टीस पडली. तीत पाहतो तो पाणी फारच थोडे असून, ते अगदी तळाशी आहे असे त्यास दिसून आले. त्याने आपली चोच आत घालून पाहिली, पण ती पाण्यापर्यंत पोचेना. त्याने पुष्कळ उपाय केले, तरी पाण्याचा एक थेंबही त्यास प्राप्त झाला नाही. मग त्याने पुष्कळसे खडे जमा करून ते त्या सुरईत टाकिले. तेव्हा त्याची चोच पोचण्याइतके पाणी वर आले, ते पिऊन त्याने आपली तहान भागविली.

तात्पर्य:- अडचणीच्या वेळी, चतुर मनुष्य काही तरी युक्ति योजून संकटातून पार पडतो.