खाकीतला माणुस

आसाम चा हिसांचाराने मुंबईचे पोलिस आयुक्त अरूप पटनाईक यांचा राजकीय बळी घेतला असचं म्हणावे लागेल (?) . आयपीएसच्या १९७९ च्या तुकडीचे अधिकारी असलेले पटनाईक यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदी बदली करण्यात आली. या पदाला पोलिस महासंचालकपदाच्या समान दर्जा आहे. यामुळे पटनाईक यांची झालेली बदली ही त्यांना मिळालेली शिक्षा आहे की, बक्षिस हा वादाचा विषय आहे. मात्र गृह खात्याने पोलिस आयुक्तांची बदली करुन मोठी खेळी केली आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारले आहेत. एकीकडे जनतेचा रोष कमी करण्यासाठी आयुक्तांची बदली केली तर दुसरीकडे ही रुटिन बदली आहे असे सांगत पटनाईकांची पोलिस आयुक्तपदाच्या समान दर्जाच्या पदावर नियुक्ती करुन राज यांच्या मोर्च्याची दखल न घेतल्याचे सुतोवाच केले.

राज ठाकारे यांनी आझाद मैदानावर काढलेल्या मोर्च्याने सामान्य माणसाबरोबरच पोलिसांच्या दडपललेल्या भावानांना वाट करुन दिली. पोलिस कॉनस्टेबल प्रमोद तावडने तर हे सिध्द केलेच पण नवनियुक्त पोलिस आयुक्त डॉ. सत्यपालसिंह यांनी पदाची सुत्रे हातात घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याला दुजोरा दिला. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलिसांचे मनोधैर्य खालवले असल्याचं वक्तव्य करुन आपल्याच खात्याची विसंगती विशद केली. पटनाईक यांनी सुरु केलेले विषेश पथक मोडित काढण्याची त्यांनी घोषणा केली. तसेच क्राईम ब्रॅंचपासून वेगळे केलेले समाजसेवा शाखा आणि क्राईम कंट्रोल हे विभाग पुन्हा क्राईम ब्रॅंचच्याच अखत्यारित काम करुन पटनाईक यांचा आणखी एक निर्णय नवनिर्वाचित आयुक्तांनी बासनात गुडांळून अप्रत्यकक्षपणे पटनाईकांची बदली योग्य असल्याचे स्पष्ट केले. या दंगलीत काही पोलिस आधिकाऱ्यांनी दंगेखोरांना ताब्यात घेतले होते पण पटनाईक यांनी त्यांना सोडुन देण्याचे आदेश दिले असं एका व्हिडीओतून समोर आले आहे. टिव्ही वरील एका चर्चेत भाग घेताना पटनाईक यांनी असे आदेश देण्यामागे आपल्यावर राजकीय दबाव नसल्याचं स्पष्ट केलं. अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी मात्र त्यांच्या या विधानावर याबाबत अविश्वास व्यक्त केला आहे. पटनाईक यांनी (त्यांच्या म्हण्याप्रमाणे) कोणताही दबाव नसताना असे का केले याचे उत्तर अजून गुलदस्त्यातच आहे. आणि जर त्यांची ही कृती राजकीय दबावानेच प्रेरित होती असे गृहीत धरले तर गृहमंत्रालयाने त्यांची केलेली बदली ही पटनाईक यांच्या राजकीय निष्ठेचेच फळ म्हणावे लागेल. राज ठकरे यांनी मात्र सामान्य माणसाबरोबरच पोलिसांचीही मनं जिंकली. पुण्यात तर पोलिसांच्या नातेवाईकांनी राज यांना आपल्या मागण्यांसाठी साकडे घातले आहे.

या सगळ्या गदारोळात पोलिसांची स्थिती मात्र दयनीय झाली आहे. कधी बोचरी टिका तर कधी स्तुतीसुमनं त्यांच्यावर उधळली जातात. प्रश्न आहे की, दहशवात रोखण्यास पोलिस खातं एकटे पुरेसे आहे का? एकेकाळी स्कॉटलॅण्ड यार्ड च्या खालोखाल नंबर लागणाऱ्या मुबंई पोलिसांच्या वाटयाला आता अवहेलना येत आहे. आजही मुंबई घुसणारे दहशवादी पोलिसांच्या तुलनेत जास्त प्रशिक्षित आणी आदयावत शस्त्रे आणि यंत्रणांनी सुसज्ज असतात. या परिस्थितीला जवाबादर कोण? दहशतवादाशी सामना करताना पोलिस य़ंत्रणा तितिकीच सुसज्ज नको का? पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद तावडे ने राज ठाकरे यांना फुल देऊन आपल्या भावनांना वाट दिल्याबद्दल आभार मानले. पण खरेतर जनतेच्या रोषाचे धनी झालेले आणि राजकीय दबावाखाली भरडल्या जाणाऱ्या पोलिस दलातल्या अनेक कर्मचाऱ्यांना पुष्प दिलं गेलं पाहिजे. खाकीतला पोलिस हा ही एक माणुसच आहे.