खरी पंडित तूच आहेस.

पुर्वी आगपेट्या निघालेल्या नव्हत्या. विस्तव करायचा म्हणजे गारगोट्यांच्या सहाय्याने कापूस जाळून मग तो तयार करावा लागे. त्यामुळे घाईगर्दीच्या वेळी शेजारपाजारहून विस्तव मागून आणण्याची पध्दत होती.

अशा त्या काळी एका धर्मपंडिताच्या घरी एक नऊ दहा वर्षाची मुलगी विस्तव मागायला गेली. पंडितानं तिला विचारलं, ‘बाळे ! अगं विस्तव मागायला आलीस खरी, पण तो नेण्यासाठी तवा आणला आहेस का?’

मुलगी म्हणाली, ‘तव्याची जरुरी नाही. मी तो हातात नेईन.’

पंडित म्हणाला, ‘वेडी आहेस की काय तू ? अगं, हातात विस्तव नेऊन हात पोळून नाहीत का जाणार तुझे?’

मुलगी म्हणाली, ‘तुम्ही विस्तव आणा तर खरे ? बघा मी तो माझ्या हातातून कसा घरी घेऊन जाते ते.’

पंडितानं विस्तव आणताच त्या मुलीनं अगंणातल्या मातीचा जाड थर ओंजळीत तयार केला आणि पंडिताला त्या मातीच्या थरावर चार-पाच निखारे ठेवायला सांगितले. तिचं हे चातुर्य पाहून पंडित म्हणाला,’मुली! माझी विद्या केवळ पुस्तकी आहे. खरी पंडीत तूच आहेस.’