कोळशातले रत्न

गोपूचे आई-वडील अतिशय गरीब होते खरे, पण गोपूसारखे हिकमती रत्न त्यांना देऊन, देवानं जणू त्यांच्याकडे असलेल्या पैशांच्या कमतरतेची त्यांना अशा तऱ्हेनं भरपाई करुन दिली होती.

ऎके दिवशी घरातला कोळसा संपला. कोळसाच काय पण चुलीसाठी साधी जळाऊ लाकडं आणायलाही घरात पैसे नव्हता. ‘आता स्वयंपाक कसा करायचा?’ या विवंचनेत गोपूची आई पडली. ही गोष्ट गोपूच्या लक्षात येताच तो म्हणाला, ‘आई ! काळजी करायचं कारण नाही, स्वयंपाकाची इतर तयारी तू जय्यत ठेव, मी तासा दोन तासात दोन वेळच्य स्वयंपाकाला पुरेल एवढा कोळसा घेऊन येतो.’ असं बोलून व हाती एक टोपली घेऊन गोपू कोळसे काबीज करायच्या मोहिमेवर निघाला.तीन एक तास झाले, आणि कोळशांनी भरलेली टोपली डोक्यावर घेतलेला व मोहीम यशस्वी झाल्यामुळे चेहरा फ़ुललेला गोपू घरात शिरला. कोळशाने भरलेली टोपली डोक्यावर घेऊन आलेल्या त्याला पाहताच वडिलांनी विचारलं, ‘गोपू ! अरे, एवढा टोपलीभरुन कोळसा तू कुठुन चोरुन तर नाही ना आणलास ?’

गोपू म्हणाला, ‘बाबा, आपण गरीब असलो, तरी सच्चाईने वागणारे आहोत. असं असता, मी कोळसा चोरुन कसा बरं आणीन ? मी तो शत्रुशी गनिमी काव्यानं झुंज देऊन जिंकून आणला आहे.वडिलांनी आश्वर्यानं विचारलं, ‘शत्रुशी झुंज देऊन ? मला नाही कळत तू काय बोलतो आहेस ते ?’

यावर गोपू म्हणाला, ‘आई, बाबा, ऎका ! आपल्या झोपडपट्टीपासून हाकेच्या अंतरावरुन रेल्वेमार्ग जातो ना ? मी तिकडे गेलो, ज्या रुळांवरुन मालगाड्या येत जात असतात त्या रुळांपासून पुरेसं अंतर ठेवून मी उभा राहिलो, आणि त्या येणाऱ्या जाणाऱ्या मालगाड्यांतल्या ड्रायव्हर व फ़ायरमेन यांच्याक्दे बघून मी हातवारे व तोंड वेडेवाकडे करुन त्यांना वाकुल्या दाखवू लागलो.’

आपलं बोलणं आई-वडील उत्कंठेनं ऎकत असल्याचं पाहून गोपू पुढं म्हणाला, ‘त्यामुळं झाल काय ? माझ्या वाकुल्यांमुळे काहीसे रागावून ते माझ्या अंगावर कोळसे फ़ेकू लागले ! अशा दहा बार मालगाड्या रुळावरुन आल्या गेल्या आणि तेवढ्या वेळा मी त्यांच्यातल्या ड्रायव्हर फ़ायरमेनना हाता-तोंडाअन वाकुल्या दाखविल्या. त्यामुळे त्यांनी माझ्या दिशेनं कोळशाचे खडेच्या खडे फ़ेकले. आपल्या अवतीभोवती पडलेले कोळसे आता एक टोपली भरण्यापुरते झाले आहेत, हे पाहूने मी ते टोपलीत भरले व घरी आलो. आई-बाबा घरातला कोळसा पुन्हा असा कधी संपला, आणि तो विकत घ्यायला पैसे नसले, तर सांगत चला बरं का मला ?’