कोल्हा आणि बोकड

एक कोल्हा एका विहिरीवर पाणी प्यावयास गेला असता, आत पडला. त्याने विहिरीतून वर येण्याचा फार प्रयत्न केला, परंतु काही उपाय चालेना. इतक्यात एक बोकड तेथे आला. त्याने कोल्ह्यास विचारले, ‘अरे, हे चांगले आहे काय ? ’ कोल्हा उत्तर करतो, ‘गडया, किती चांगले म्हणून सांगू ? हे पाणी अमृतासारखे गोड आहे. पिता पिता माझी इच्छा तृप्तच होत नाही आणि येथून निघावे असे वाटत नाही.’ ते ऐकताच बोकडाने आत उडी टाकली. त्याची शिंगे मोठी होती, त्यांजवर पाय देऊन, कोल्हा उडी मारून, ताबडतोब विहिरीबाहेर निघून गेला. बिचारा बोकड पाण्यात गटकळ्या खाता खात बुडून मरण पावला !

तात्पर्य:- लोक जे जे करतात, ते बहुधा स्वार्थाने करतात. दुसऱ्याच्या हितासाठी उदयोग करणारे विरळा; उलट आपला स्वर्थ साधण्यासाठी दुसऱ्याचा नाश करणारेच फार. म्हणून, जो कोणी काही लालूच दाखवील, त्या मनुष्याच्या प्रामाणिकपणाबद्दल पूर्ण खात्री करून घेतल्याशिवाय, त्याच्या भाषणावर विश्वास ठेवू नये.