कोल्हा आणि लांडगा

एक कोल्हा एके दिवशी एका लांडग्यास म्हणाला, ‘गडया, माझी स्थिती किती वाईट आहे, याची तुला कल्पनाही नाही. एखादा म्हातारा कोंबडा किंवा एखादी मरायला टेकलेली अशक्त कोंबडी यांच्या मांसावर मला निर्वाह करावा लागतो व त्यामुळे मी अगदी कंटाळल्यासारखा झालो आहे. मला वाटते, यापेक्षा तुझी स्थिती किती तरी चांगली आहे. शिवाय, भक्ष्य मिळवितांना आपला जीव धोक्यात घालण्याचा प्रसंग तुला क्वचितच येत असेल. मला भक्ष्याच्या शोधासाठी गांवढ्यांतून लपत लपत फिरावे लागते, पण तुझे तसे नाही. तू आपले भक्ष्य रानात किंवा कुरणात मिळवू शकतोस. ही तुझी विदया तू मला शिकवशील तर फार चांगले होईल. तुझ्या अध्यापनाखाली राहिल्याने, कोल्ह्याच्या वंशात जन्म घेऊन, पहिल्यानेच मेंढी मारून खाण्याचा मान मला मिळेल, अशी मला उमेद आहे. तू मला शिक्षण देऊन पाहशील तर आपले श्रम फुकट गेले, असे म्हणण्याचा प्रसंग तुजवर खचित येणार नाही.’ लांडगा म्हणाला, ‘ठीक आहे, मी प्रयत्न करून पाहतो. पहिल्याने, तू त्या पलिकडच्या शेतात जा आणि तेथे माझा भाऊ मरून पडला आहे, त्याचे कातडे पांघरून ये. ’ त्याप्रमाणे कोल्हा ते कातडे पांघरून आल्यावर, लांडग्याने त्याला, निरनिराळ्या प्रकारचे धडे शिकविले. गुरगुरणे, चावणे, लढाई करणे आणि मेंढयांच्या कळपावर तुटून पडून एखादी मेंढी उचलून नेणे, इत्यादि गोष्टींचे शिक्षण त्याने कोल्ह्यास दिले. पाहिल्याने, कोल्ह्याच्या हातून चांगलासा अभ्यास झाला नाही, परंतु तो मूळचाच तैलबुद्धि असल्यामुळे लवकरच ते सगळे धडे त्याने अगदी मुखोद्रत करून टाकले. त्याची हुशारी पाहून लांडग्यासही मोठे आश्चर्य वाटेल. शेवटी, एक मोठा मेंढयांचा कळप त्या कोल्ह्याच्या दृष्टीस पडताच, तो मोठया आवेशाने त्याजवर तुटून पडला. आणि एका क्षणांत, मेंढया, धनगर व त्याचे कुत्रे या सर्वांची त्याने अगदी दाणादाण करून सोडली. त्याने एक भली मोठी मेढीं आपल्या तोंडात धरली व आता तो तिच्या नरडीचा घोट घेणार, तोच जवळच्या शेतातून आलेला एका कोंबडयाचा शब्द त्याच्या कानी पडला. तो ओळखीचा शब्द कानी पडताच त्याला आपल्या नवीन वेषाचे भान राहिले नाही. त्याने ते लांडग्याचे कातडे फेकून दिले व आपल्या गुरूचाही निरोप न घेता तो तडक त्या शेताकडे धावत सुटला !

तात्पर्य:- मूळस्वभाव जाईना !’