कोल्हा आणि रानडुक्कर

एका अरण्यात, एक रानडुक्कर झाडाच्या बुंध्यावर आपल्या दाढेस धार लावीत होता. तेथे एक कोल्हा आला तो त्यास विचारतो, ‘अरे, तुझ्यावर कोणी शत्रू चाल करून आल्याचे चिन्ह तर येथे दिसत नाही, असे असता तू उगाच आपली दाढ घाशीत बसला आहेस, याचे कारण काय ?’

डुक्कर उत्तर करितो, ‘गडया, मजवर कोणी शत्रू चाल करून आला नाही, ही गोष्ट खरी; पण फावल्या वेळी आपल्या हत्यारास धार लावून ते तयार ठेवावे, हे बरे असे मला वाटते; कारण संकटाचे वेळी तितकी तयारी करण्यास अवकाश सापडेलच, याचा काय नेम ?’

तात्पर्य : घरास आग लागल्यावर, मग विहीर खणण्यास निघणे हा मूर्खपणा होय.