कोल्हा आणि वानर

सगळ्या जनावरांचा राजा जो सिंह, तो मरण पावल्यावर, दुसरा राजा निवडण्यासाठी जनावरांनी एक सभा भरवली. तीत वानराने आपल्या खोडकरपणाने सगळ्या पशूंस इतके रंजविले की, त्यांनी त्यासच आपला राजा केले. पण कोल्ह्यास ती गोष्ट आवडली नाही. मग त्याने वानराची चांगली खोड मोडण्याचा निश्चय केला. एके दिवशी, एका शेतऱ्याने, एक सापळा लावून ठेवला होता, तो कोल्ह्याच्या दृष्टीस पडताच, तो वानरापाशी आला आणि म्हणाला, ‘महाराज, एके ठिकाणी मी पुष्कळसे खोबरे पाहून आलो आहे, ते खाण्याची आपली इच्छा असल्यास मजबरोबर चला, मी ते आपणास दाखवितो. खोबऱ्याची गोष्ट ऐकताच वानराच्या तोंडास पाणी सुटले. मग तो कोल्ह्याबरोबर चालला असता कोल्ह्याने त्या सापळ्यातले खोबरे त्यास दाखविले. ते घेण्यासाठी वानराने आपला हात सापळ्यात घातला, तो चाप बसून त्याची बोटे आत अडकली! आपणास फसविल्याबद्दल त्याने कोल्ह्याला पुष्कळ शिव्या दिल्या, तेव्हा हसत हसत कोल्हा म्हणतो, ‘अरे , तू राजा असता, हा सापळाही तुला ओळखता येऊ नये काय?’