लांडा कोल्हा

एक कोल्हा लोखंडाच्या सापळ्यात शेपूट अडकून सापडला असता, ते तोडून तो पळला. पहिल्याने त्याला हर्ष झाला की, प्राणावर आले होते ते शेपटावरच गेले. परंतु जेव्हा तो आपल्या मंडळीत जाऊ लागला, तेव्हा त्यास आपल्या लोंडेपणाबद्दल फार वाईट वाटून तो मनात म्हणतो, ‘मी मेलो असतो तर बरे होते, परंतु ही अपेष्ट फार वाईट. असो, जे झाले त्यास उपाय नाही; आता हेच कसे तरी शोभवून नेले म्हणजे झाले. पण यास युक्ती काय करावी ?’ याप्रमाणे विचार करीत असता, त्यास एक युक्ती सुचली, ती अशी की, आपण सर्व कोल्हे मंडळीस एकत्र करावे, आणि सांगावे की, ‘मी आपली शेपटी तोडून टाकून ही भूषणाची नवी तऱ्हा काढली आहे. ही चांगली आहे. तुम्ही अवश्य घ्यावी.’ मग त्याने सगळ्या कोल्ह्यांस आपल्या घरी बोलाविले व त्यांजपुढे आपल्या युक्तीसंबंधाने मोठे वाक्‌पांडित्य करू लागला, तो म्हणाला, ‘अहो, या शेपटापासून काहीच फायद नाही. त्यातही कोल्ह्याची शेपटी म्हणजे केवळ ओझेच. यासाठी ही शेपटी तोडून टाकल्याने एक प्रकारचे सौंदर्य येऊन, शिवाय पळण्यासवरण्यास ही जी एक अडचण आहे, तीही नाहीशी होईल. मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे व शेपूट तोडून टाकल्यापासून मला फार सुख झाले आहे. ते सुख तुम्हांस प्राप्त व्हावे अशी माझी इच्छा आहे.’ इतके बोलून, आपले चेले किती होतात, हे जाणण्यासाठी तो सर्वांच्या तोंडाकडे पाहू लागला. इतक्यात, त्या कोल्हेमंडळीतला एक लुच्चा म्हातारा कोल्हा, ती त्याची ठकविदया ओळखून, मान वाकडी करून म्हणतो, ‘पंडितबाबा, आता पांडित्य पुरे करावे; शेपटी टाकल्यामुळे आपले कल्याण झाले असेल, यात शंका नाही; व आम्हांवर जेव्हा तसा प्रसंग येईल, तेव्हा आम्हीही आपली शेपटे टाकू तोपर्यंत तुम्ही आम्हांस आग्रह न करावा हे बरे.’

तात्पर्य:- आपली अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आपणामध्ये जे व्यंग आहे, ते व्यंग नसून गुणच आहे, असे कित्येक लोक मतलबाने सांगत असतात; पण शहाणे लोक त्याच्या हेतूकडे लक्ष देऊन त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवीत नाहीत.