लांडगा आणि बगळा

एका लांडग्याने एक बोकड मारून खाल्ला त्याचे हाडूक त्याच्या गळ्यात अडकले. मग त्या दुःखाने तो रानांतून ओरडत फिरू लागला. जो जो प्राणी भेटे, त्याची प्रार्थाना करी की, ‘दादा, कृपा करून एवढे माझ्या गळ्यातील हाडूक काढशील, तर मी तुला चांगले बक्षीस देईल. ’ ते ऐकून एक बगळा बक्षिसाच्या आशेने पुढे झाला आणि प्रथम ‘बक्षीस देईन’ असे लांडग्याकडून वचन घेऊन, त्याने त्याच्या तोंडात आपली लांब मान घातली आणि हाडूक बाहेर काढले. नंतर, तो बक्षीस मागू लागला, त्यावेळी डोळे वटारून त्यास म्हणतो, ‘अरे ! तुझ्यासारखा मूर्ख मी त्रिभुवनात पाहिला नाही. तू हाडूक काढीत होतास, त्यावेळी तुझी मान माझ्या तोंडात होती, ती न चावता, मी तुला जिवंत सोडला, तरी अजून तू संतुष्ट नाहीस ?’

तात्पर्य:- उपकारास अपकार करणे हा दुष्टांचा जातिस्वभावच होय, अशांच्या हातून हानी न होता सुटका झाली, म्हणजे फार मिळविले म्हणून समजावे.