लांडगा आणि घोडा

एक लांडगा हरभऱ्याच्या शेतातून बाहेर पडला, तो त्याला एक घोडा भेटला. तेव्हा तो त्यास म्हणतो, ‘भाऊ, त्या शेतात तू लक्कर जा. त्यात हरभऱ्याचे पीक फार चांगले आले आहे. तू माझा आहेस व तू चणे फोडू लागलास म्हणजे त्याचा जो शब्द होतो, तो ऐकून माझ्या मनास फार आनंद होतो, हयासाठी मी तेथील हरभऱ्याच्या एका घाटयासही न शिवता, सगळे शेत तुजकरीता जसेच्या तसे सोडून आलो.’ हे ऐकून घोडा उत्तर करतो, ‘अरे, जर हरभरा हे तुम्हा लांडग्याचे खादय असते, तर तू आपल्या पोटाला उपाशी मारून माझ्या दातांच्या आवाजाने आपल्या कानाला आनंदविण्याची इच्छा धारण केली नसतील; आणि त्या शेतात हरभऱ्याच्या एक दाणाही शिल्लक ठेवला नसतास.’

तात्पर्य:- आपणास जिचा मुळीच उपयोग नाही अशी वस्तू दुसऱ्यास देण्यात मोठेसे औदार्य आहे असे नाही.