लांडगा आणि मेंढी

कुत्र्यांनी मारून मारून अर्धमेला केलेला एक लांडगा एका ओढयाच्या काठी पडला होता. त्याला फार तहान लागली होती व थोडेसे पाणी पिताच आपणास हुषारी येईल असे त्यास वाटत होते. इतक्यात एक मेंढी त्या ठिकाणी आली, तिला लांडगा म्हणतो, ‘ताई जवळच्या ओढयाचे थोडेसे पाणी जर मला आणून देशील तर मोठे उपकार होतील. मला फक्त पाणी पाहिजे आहे. मांस नको.’ मेंढी उत्तर करिते, ‘बाबारे, या वेळी जरी तुला मांसाची जरूरी नसली तरी पाणी मिळतांच ते पिण्यापूर्वी माझे मांस खावे असे तुला सहजच वाटेल. याकरितां तुझी विनंती मला मान्य करवत नाही.’

तात्पर्य:- दुसऱ्यावर उपकार करावा हा मनुष्याचा धर्मच आहे, पण ज्या लोकांवर उपकार केला असता, उलट अपाय होण्याचा संभव असेल, त्यांजवर उपकार करणे शहाणपणाचे नाही.